अमृतवाणी संस्कृतभाषा !

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्रावण पौर्णिमा ! हा दिवस रक्षाबंधनाबरोबरच `संस्कृतदिन' म्हणूनही साजरा केला जातो. त्या निमित्ताने संस्कृतबद्दलचा अभिमान जागवण्याचा हा एक प्रयत्‍न !


देववाणी संस्कृत
रत्‍नागिरीसंस्कृतची आजची स्थिती पाहण्याअगोदर संस्कृत भाषेचा उद्भव कसा झाला, ते पाहूया. आपल्या वैदिक परंपरेने विश्‍वनिर्मितीपासूनचा साद्यंत इतिहास जतन करून ठेवला आहे. प्रथम सर्वत्र शून्य होते. मग `ॐ' असा ध्वनी अवकाशात निनादला. शेषषायी श्रीविष्णु प्रगट झाले. त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगटले. त्यानंतर प्रजापती, मातृका, धन्वंतरी, गंधर्व, विश्‍वकर्मा आदी निर्माण झाले. याच वेळी विश्‍वाचे ज्ञानभांडार ज्यात सामावले आहे, असे वेद ईश्‍वराने उपलब्ध करून दिले. वेद संस्कृत भाषेत आहेत. संस्कृत ही `देववाणी' आहे. वेद जसे अपौरुषेय म्हणजे ईश्‍वरप्रणीत आहेत, तशीच संस्कृत भाषाही ईश्‍वरनिर्मित आहे. तिची रचना व लिपी ईश्‍वराने निर्माण केली आहे; म्हणून त्या लिपिलाही `देवनागरी' म्हणतात. संस्कृत भाषेची सर्व नावेही ती देवभाषा असल्याचे स्पष्ट करतात, उदा. `गीर्वाणभारती' हे नाव पहा. त्यातील `गीर्वाण' या शब्दाचा अर्थ `देव' असा आहे. रानटी अवस्थेतील मानवाने पशू-पक्ष्यांच्या आवाजांचे अनुकरण करून भाषा तयार केली असावी, हे पाश्चात्त्यांचे अनुमान योग्य नाही. माता-पिता आणि कुटुंबीय बालकाशी सतत बोलून त्याला भाषा शिकवतात, म्हणून मूल बोलायला शिकते. क्रूरकर्मा अकबराने एक प्रयोग करून बघितला. त्याने काही अर्भकांना एका जंगलात ठेवले. त्या अर्भकांना सांभाळणार्‍या सेवकांना त्याने तंबी देऊन ठेवली की, त्या मुलांच्या कानावर एकही शब्द पडता नये. १० वर्षांनी या मुलांना अकबरासमोर आणण्यात आले. त्या वेळी त्या मुलांना एकही शब्द उच्चारता आला नाही. ती सर्व मुले मुकीच राहिली होती. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग या तीन युगांमध्ये संस्कृत हीच विश्‍वाची भाषा होती. त्यामुळे तिला `विश्‍ववाणी'ही म्हणतात. अगदी कौरव-पांडवांच्या काळापर्यंत संस्कृत हीच विश्‍वातील एकमेव भाषा होती. कौरव-पांडवांच्या त्या महाभारतीय युद्धानंतर वैदिक म्हणजेच हिंदूंचे विश्‍वसाम्राज्य हळूहळू आक्रसत आल्यावर संस्कृत भाषेचीही मोडतोड होऊन तिच्या वेड्यावाकड्या प्रादेशिक उच्चारातून अन्य भाषा निर्माण झाल्या. त्यामुळेच इंग्रजीसारख्या भाषांमध्ये संस्कृतशी साम्य दाखवणारे शब्द विपुल प्रमाणात आढळतात, उदा. गायीला संस्कृतमध्ये `गौ', तर इंग्रजीत `cow' म्हणतात, दाताला `दंत' तर इंग्रजीत `dentt' म्हणतात.

कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ !

प्रश्‍न असा पडतो की, समृद्ध असणार्‍या `गीर्वाणवाणी' संस्कृतला एकदम उतरती कळा का लागली ? अमूल्य असा हा वैश्‍विक ठेवा आपण गमावून का बसलो ? मुसलमान आक्रमकांनी जाळपोळ करून आमच्या संस्कृत ग्रंथांची राखरांगोळी केली, तर इंग्रजांनी आमच्या वैदिक शिक्षणव्यवस्थेची पाळेमुळेच उखडून टाकली. कारकून तयार करणार्‍या त्यांच्या शिक्षणप्रणालीमुळे इंग्रजी मन आणि मेंदू असलेला हिंदु नागरिक निर्माण झाला. परिणामी संस्कृतचे जतन जेवढ्या प्रमाणात व्हायला हवे होते, तेवढे झाले नाही. संस्कृतची अशी स्थिती झाल्यामुळे गेल्या शतकात ही भाषा नामशेष होते कि काय, असे वाटू लागले होते. शाळांमध्ये संस्कृत शिकणारे विद्यार्थी नाहीत म्हणून शिक्षक नाहीत आणि शिक्षक नाहीत म्हणून विद्यार्थी नाहीत, असे चित्र दिसत होते. त्यातच स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांच्या पंतप्रधानपद भोगलेल्या नातवाने (राजीव गांधी यांनी) संस्कृतला प्रोत्साहन देण्याऐवजी तिला `मृत भाषा' असे संबोधून कुर्‍हाडीच्या दांड्याची भूमिका निभावली. हिंदुद्वेषामुळे संस्कृतला `मृत' म्हणणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की, आजही अनेक नियतकालिके, पुस्तके संस्कृतमध्ये प्रकाशित होतात. आकाशवाणी व दूरदर्शन यांवरून प्रतीदिन संस्कृतमधून वार्तापत्रे सादर केली जातात. मंगल कार्यांत संस्कृत मंत्रपठण केले जाते. घराघरांतून संस्कृतमधून स्तोत्रे म्हटली जातात. हे सर्व पाहून संस्कृत भाषेला `मृत' म्हणण्याचे धाडस करणार्‍यांची कीवच येते !

`संस्कृति: संस्कृताश्रिता: ।'

वास्तविक पहाता जगातील सर्व भाषा संस्कृतोद्भव आहेत. त्यामुळे एखादी भाषा शिकतांना संस्कृतचा आधार घेतल्यास ती शिकणे अधिक सोपे जाते. व्याकरणकर्ता पाणिनीने संस्कृत भाषेचे व्याकरण सूत्रबद्ध व नियमबद्ध रीतीने मांडले आहे. एवढे सर्व असतांना फारसे काटेकोर नियम नसणारी, लेखनाप्रमाणे उच्चार नसणारी आणि शब्द भांडारातही दरिद्री असणारी इंग्रजी भाषा पहिलीपासून शिकवण्याचा अट्टाहास का केला जातो ? आता मात्र संस्कृतला चांगले दिवस येत आहेत. विद्यार्थी आपणहून संस्कृतकडे वळत आहेत. संगणकीय प्रणालीतही संस्कृतचा वापर सर्व भाषांपेक्षा चांगला होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. जगाच्या प्रारंभापासून असलेली संस्कृत भाषा जगाच्या अंतापर्यंत राहील, हे सांगायला कोणा होराभूषणाची गरज नाही. `संस्कृति: संस्कृताश्रिता: ।' असे म्हणतात. संस्कृती ही संस्कृतच्या आश्रयाला असते. म्हणजे जेथे संस्कृतचे अध्ययन होते, तेथे संस्कृती वास करते. संस्कृतचा अभ्यास करणारी व्यक्‍ती ही संस्कृतीशील, सौजन्यशील असते. ही देववाणी असल्याने तिचे उच्चार जरी कानावर पडले, तरी आनंद वाटतो.

सरल मधुर ही संस्कृत भाषा

`सुरस सुबोधा विश्‍वमनोज्ञा ललिताहृद्या रमणीया । अमृतवाणी संस्कृतभाषा नैव क्लिष्टा, नच कठीना ।।' या काव्यपंक्‍तीत वर्णन केल्याप्रमाणे संस्कृत भाषा ही खरोखरच `अमृतवाणी' आहे. संस्कृतप्रेमी, संस्कृतचे शिक्षक, विद्यार्थी आणि हिंदु धर्माभिमानी यांनीच आता संस्कृत भाषेच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत; कारण संस्कृत आणि संस्कृती यांचा फार जवळचा संबंध आहे !

साभार : अमृतवाणी संस्कृतभाषा !

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: