महाराष्ट्राचे आराध्य दैवत : विठ्ठल

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


तत्त्व
श्री विठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. श्री विठ्ठलाचे सर्व भक्‍तगण भोळा भाव असलेले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठलाला `भक्‍ताचे रक्षण करणारी आराध्यदेवता', असे संबोधले जाते. संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले व शत्रूपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.

`पांडुरंग' या नामाचे वैशिष्ट्य
श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्यामुळे दह्या-दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाचे रूप धारण केले. त्यामुळे शास्त्रांत व पुराणांत पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असला, तरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला `पांडुरंग' म्हणतात.

तुमच्यातील `भक्‍तीभाव' हा घटक वाढण्यासाठी माझे कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, असे श्री विठ्ठलाने सांगणे :
साधकांनो, ईश्‍वरीराज्य आणण्यासाठी तुमच्यात भक्‍तीभाव असण्याची नितांत आवश्यकता आहे. जेवढा तुमचा भक्‍तीभाव जास्त, तितक्या लवकर ईश्‍वरी राज्य येईल. त्यामुळे तुमच्यातील `भक्‍तीभाव' हा घटक वाढण्यासाठी माझे कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. मी साधकांच्या मदतीला सतत धावून येईन.

श्री विठ्ठलाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये
तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्‍नी असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी रहाते.

भक्‍ताच्या हाकेला लगेच `ओ' देणारी देवता
श्री विठ्ठल भक्‍ताच्या हाकेला लगेच `ओ' देणारी देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला भक्‍तगण `विठूमाऊली' या नावाने संबोधतात.
श्री विठ्ठल खूप मायाळू व प्रेमळ अंत:करणाचा असल्याने `तो भक्‍तांसाठी धावत येणारच आहे', असा भक्‍तांचा ठाम विश्‍वास असतो. त्याच दृढ भावापोटी विठूमाऊलीने भक्‍तांची दळणे दळली, गोवर्‍या थापल्या व भक्‍ताची सेवा केली.

मूर्तीविज्ञान
काळया रंगाची, बटबटीत डोळयांची, दोन्ही हात कमरेवर ठेवलेली व विटेवर उभी, अशी विठ्ठलाची मूर्ति असते. पुंडलिकाने केलेल्या आईवडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्या वेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे रहायला सांगितले; कारण त्याला आईवडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. त्याच्या सेवेकडे कौतुकाने पहात विठ्ठल उभा राहिला. इतर देवांच्या मूर्तींत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो. तसे या मूर्तीत नाही. काही न करता सर्वत्र साक्षिभावाने पहाणारा विठ्ठल त्यात दाखविला आहे. कमरेच्या वर ज्ञानेंद्रिये आहेत, तर खाली कर्मेंद्रिये आहेत. कमरेवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये ताब्यात असलेला.
२. विठोबा म्हणजे ज्ञानमूर्ती !

विठ्ठल
अ. व्युत्पत्ति : `विठ्ठल शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती आहेत. कै. राजवाड्यांच्या मते `विष्ठल' शब्दावरून विठ्ठल हे रूप तयार झाले. विष्ठल म्हणजे दूर, रानातील जागा किंवा स्थळ होय. यावरून विठ्ठलदेव म्हणजे रानात असणारा देव, असा त्याचा अर्थ होतो. डॉ. रा.गो. भांडारकर म्हणतात की, विष्णु या संस्कृत शब्दाचे कानडी अपभ्रंश रूप बिट्टी होते आणि या अपभ्रंशापासून विठ्ठल शब्द तयार झाला. विष्णूचा विठ्ठु असा अपभ्रंश आर्य-प्राकृत भाषांच्या नियमानुसार होतो. श्री. चि.वि. वैद्यांचेही असेच मत आहे. कै. विष्णुबुवा जोग यांना `वीचा केला ठोबा' या तुकारामाच्या अभंगाच्या आधारे सांगितलेली व्युत्पत्ति अशी - वि विद् म्हणजे जाणणे किंवा ज्ञान आणि ठोबा म्हणजे मूर्ती, म्हणून विठोबा म्हणजे ज्ञानमर्ती.

आ. दुसरे नाव : पांडुरंग. विठोबाला पांडुरंग असेही म्हणतात. हे नाव त्याला कसे मिळाले, ते सांगता येत नाही; कारण पांडुरंग हे धवल शिवाचे नाव आहे. याचेच कानडीत पंडरंगे हे रूप होते; म्हणून पांडुरंग अथवा पंडरंग याचे पूर ते पंढरपूर होय, असे डॉ. भांडारकर म्हणतात.' विठ्ठलाची मूर्ती काळया रंगाची असूनही त्याला पांडुरंग (पांढर्‍या रंगाचा) हे नाव कसे, असा काही जणांना प्रश्‍न पडतो. वर दिलेल्या मुद्याखेरीज त्याचे उत्तर असे की, खर्‍या भक्‍ताला सूक्ष्मदर्शनेंद्रियाने ती मूर्ति पांढरीच दिसते. महिन्यातील दोन एकादशांपैकी पहिली विठ्ठलाच्या नावे व दुसरी पांडुरंगाच्या नावे करतात.

विष्णु : व्युत्पत्ती व अर्थ `विष् सतत क्रियाशील असणे, विश् व्यापणे यावरून यास्काने या शब्दावरूनही तो शब्द सिद्ध होतो, असा पर्याय दिला आहे (निरुक्‍त १२.१९).
इतर नावे : विष्णूचे `विष्णुसहस्रनाम' हे स्तोत्र प्रसिद्ध आहे. या हजार नामांचा उच्चार करून विष्णूला तुलसीदले किंवा कमळे अर्पण करतात. सर्व नावे विष्णूचीच असली, तरी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध व त्यांच्याशी संबंधित शक्‍ती एकत्र असतात, या नियमानुसार विष्णूच्या या निरनिराळया नावांतून निरनिराळया प्रकारच्या शक्‍ती कार्यरत होतात. एका स्तोत्रपंक्‍तीत म्हटले आहे की, औषध घेतांना विष्णूचे स्मरण करावे. जेवतांना जनार्दनाचे, झोपतांना पद्मनाभाचे, लग्नाच्या वेळी प्रजापतीचे, युद्धाच्या वेळी चक्रधराचे, प्रवासात त्रिविक्रमाचे, मृत्यूच्या वेळी नारायणाचे, वाईट स्वप्न पडल्यास गोविंदाचे, संकटामध्ये मधुसूदनाचे, अरण्यामध्ये नारसिंहाचे स्मरण करावे.

इ. पत्‍नी (शक्‍ती) : देवांच्या पत्‍नी म्हणजे त्यांच्या शक्‍ती होत. या तारक व मारक अशा दोन प्रकारच्या असतात. विठ्ठल हा उत्पत्ती, स्थिती व लय यांपैकी स्थितीचा देव असल्याने त्याच्या दोन्ही शक्‍ती, म्हणजे पत्‍नी, उत्पत्ति व स्थितीशी संबंधित आहेत. राई व रुक्मिणी ह्या विठ्ठलाच्या पत्‍नी होत.
इ १. राई : राई म्हणजे मातीचा कण. तो पृथ्वीच्या सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. (शिरीष म्हणजे राईला आलेले फूल.) राईलाच पद्मावती किंवा पदुबाई म्हणतात. पद्मकोश म्हणजे गर्भाशय.
इ २. रुक्मिणी (रखुमाई) : रुक्मिणी म्हणजे वारूळ किंवा शंखाचा आकार. हेही गर्भाशयाचे प्रतीक असते.

ई. आषाढी एकादशी : आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी (देवांच्या निद्रेची) व वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधि करतात.

उ. पंढरपुरची वारी : हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाही याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते असे समजले जाते.
(संदर्भ : सनातनतर्फे प्रकाशित ग्रंथ : विष्णु व विष्णूची रूपे)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: