श्राद्धासाठी लागणार्‍या साहित्याविषयी माहिती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्‍तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे `देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण ही चार ऋणे फेडणे' होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी `श्राद्ध' आवश्यक असते. पितृऋण फेडणार्‍या श्राद्धामुळे देवऋण व ऋषीऋण फेडणे सुलभ होते. अशा या श्राद्धाविषयीची काही तात्त्विक माहिती यापूर्वी पाहिली आहे. आज आपण `श्राद्धाची तयारी व श्राद्ध करण्याच्या संदर्भातील कृती' याअंतर्गत श्राद्धासाठी लागणार्‍या साहित्याविषयी माहिती पाहूया.



श्राद्धासाठी लागणारे साहित्य
१. सर्वसाधारण साहित्य (श्राद्धद्रव्ये) :
`आसने, तीन ताम्हण, तांब्या, पळी-पंचपात्रे, दर्भ, पांढरी लोकर, वस्त्र, धोतर, जानवी जोड, पंचा, शाल, चादर, पांढरे गंध, उगाळलेले गोपीचंदन, काजळ किंवा सुरमा, कापूर, धूप, दीप, सुवासिक पांढरी फुले, माका, तुळस, सुपार्‍या, अगस्तीची पाने, विड्याची देठ असलेली पाने, सातू, काीही (न सडलेला तांदूळ), यव (सवाद), काळे तीळ, उडीद, गहू, सावे, मूग व मोहरी, मध, सुटे पैसे, भस्म, केळीची पाने किंवा मोहाच्या पत्रावळी, केळीचे द्रोण, तयार झालेला स्वयंपाक, तूप व काळास अनुसरून दक्षिणा.

२. अधिक योग्य पदार्थ (फुले, फळे व धान्य) : अगस्ती, कांचन, मोगरा, जाई, जुई, सोनटक्का, दुहेरी तगर, सोनचाफा, नागचाफा, पारिजात, बकुळी, सुरंगी इत्यादी फुले; महाळुंग, उंबर, आवळे, चिंच, आमसूल, आंबाडा, कवठ, मकाणा, अक्रोड, चारोळी, खारीक, खजूर, नारळ, केळी, द्राक्षे, डाळिंब, बोरे, फणस, खरबूज इत्यादी फळे व सुका मेवा; काळे उडीद, सावे, राळे, चुका, प्रियंगु, मोहरीचा कल्क, देवभात व लाह्या इत्यादी धान्य.

३. वर्ज्य पदार्थ : श्राद्धासाठी लागणार्‍या उपयुक्‍त पदार्थांचा विचार करतांनाच श्राद्धासाठीचे वर्ज्य पदार्थ कोणते, याचा विचार करणेही तेवढेच महत्त्वाचे ठरते. वर्ज्य पदार्थांची यादी पुढे दिली आहे.
अ. कांदा, लसूण, मीठ, वांगे, वाटाणे, हरीक व पुलक नावांचे भात, राजगिरा, शेवगा, गाजर, कोहळा, वावडींग, मांस, काळे जिरे, मिरी, बिडलोण, शीतपाकी, अंकुर फुटणार्‍या भाज्या, शिंगाडे, जांभळया रंगाचे व नासलेले-कुजलेले पदार्थ.
आ. दुर्गंधीयुक्‍त, खारे, शिळे, ज्याने गायीची तहान भागत नाही असे, डबक्यातले व रात्री भरून ठेवलेले पाणी.
इ. वत्सरहित किंवा प्रसूत होऊन दहा दिवस पूर्ण न झालेल्या गायीचे दूध
ई. बकरी, मेंढी, घोडी, उंटीण, म्हैस यांचे दूध व दुधाचे पदार्थ (मात्र म्हशीचे तूप योग्य आहे.)
उ. मांजर, कुत्रा, उंदीर इत्यादींनी उष्टावलेले पदार्थ
ऊ. `पूर्वी प्रणीवध करून मांसाने पितरांना तृप्‍त करीत', असा आधुनिक वेद-संशोधकांचा दावा आहे; पण ब्राह्मणांना मांसभक्षण निषिद्ध आहे. (श्राद्धात ब्राह्मणभोजन महत्त्वाचे मानले आहे.) या संदर्भातील एक श्लोक पुढीलप्रमाणे -

यस्तु प्रणिवधं कृत्वा, मांसैस्तर्पयते पितृन् ।
स विद्वांश्चन्दनं दग्ध्वा कुर्यादंगार विक्रयम् ।।
क्षिप्‍त्वा कूपे यथा कंचित् बाल आदातुमिच्छति ।
पतत्यज्ञानत: सोऽपि मांसेन श्राद्धकृत्तथा ।।

अर्थ : प्रणीवध करून जो मांसाने पितरांना तृप्‍त करतो, तो `चंदन जाळून कोळशाचा व्यापार करायला सिद्ध झाला आहे', असे समजावे. विहिरीत एखादा पदार्थ टाकल्यावर तो घेण्याकरता हात लांब करून डोकावणारा बालक जसा विहिरीत पडतो, तसेच मांसाने श्राद्ध करणारा स्वत:च्याच हाताने स्वत:चा विनाश ओढवून घेतो. मांसाने श्राद्ध करणार्‍याला पाप लागते.'

ए. `धर्मसिंधु' या ग्रंथात दिल्यानुसार आमिष पदार्थ (वर्ज्य पदार्थ) :प्राण्यांच्या हाडांचा चुना, चर्मपात्रातले पाणी, महाळुंग, ईडलिंबू, वैश्‍वदेव न झालेले अन्न, श्रीविष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसुरा व मांस हे आठ आमिष पदार्थ होत.

४. दर्भ
अ. `हा गवताचा एक प्रकार आहे. श्राद्धासाठी दर्भ घेतांना ते हिरवे असावेत. अनेक आघात करून किंवा नखांनी दर्भ तोडू नयेत. रस्त्यावरील, चितेवरील, यज्ञभूमीवरील, श्राद्धात वापरलेले आसन व आच्छादन यांपैकी व पिंडावरील दर्भ उपयोगात आणू नयेत. तसेच ब्रह्मयज्ञ, तर्पण यांतील व मूत्र वा शौचविधी करण्याच्या जागेवरील दर्भ घेऊ नयेत.
`समूलस्तु भवेत् दर्भ: पितृणां श्राद्धकर्मणि ।', म्हणजे पितरांचे श्राद्ध करतांना दर्भ मुळासकट घ्यावेत. याचे कारण असे की, दर्भाच्या मुळाने पितृलोकाला जिंकता येते.
आ. श्राद्धासाठी दर्भ उपटण्याच्या वेळी म्हणावयाचा मंत्र

विरिंचिना सहोत्पन्न परमेष्ठि निसर्गज ।
नुद सर्वाणि पापानि दर्भस्वस्ति करो भव ।।



या मंत्राने श्रावणातील अमावास्येला, ईशान्य दिशेकडे तोंड करून, `हुं फट्', असे म्हणून दर्भ तोडावेत.'

संदर्भ : सनातनचा ग्रंथ `श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)'.
ग्रंथ हवा असल्यास संपर्क : पनवेल - (०२१४३) २३३ १२०)

अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरील पुढील मार्गिकेला भेट द्या -

http://dainik.sanatan.org/visheshank/pitrupaksha

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: