तर्पण व पितृतर्पण म्हणजे काय ? ते कश्यासाठी करावे ? कधी करावे ? त्याचे महत्त्व काय ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवासुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते, असे भारतीय संस्कृती सांगते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि त्याद्वारे पितरऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. लहानपणी तळहातावरील फोडाप्रमाणे आपल्याला जपणार्‍या आपल्या माता-पित्यांचा मृत्योत्तर प्रवास हा सुखमय व क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्‌गती मिळावी यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. श्राद्धविधीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे तर्पण व पितृतर्पण. आज आपण तर्पण व पितृतर्पण यांविषयी माहिती पाहूया.तर्पण
१. अर्थ :
देव, ऋषी, पितर व मनुष्य यांना जलांजली (उदक) देऊन तृप्‍त करणे, म्हणजे तर्पण होय.
२. उद्देश : ज्यांच्या नावांचा उल्लेख करून तर्पण केले जाते, त्या देव, पितर आदींनी आपले कल्याण करावे, हा तर्पण करण्याचा हेतू असतो.
३. प्रकार : ब्रह्मयज्ञांग (यज्ञाच्या वेळी करावयाचे), स्नानांग (नित्य स्नान केल्यानंतर करावयाचे), श्राद्धांग (श्राद्धात केले जाणारे) अशी अनेक विधींची अंगभूत तर्पणे असतात व ती त्या त्या प्रसंगी करायची असतात.
४. तर्पण करण्याची पद्धत
अ. `तर्पण नदीवर करावे', असे बोधायनाने सांगितले आहे. हे तर्पण नदीमध्ये नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून किंवा नदीच्या काठी बसून करावे.
आ. देव व ऋषी यांना पूर्वाभिमुख होऊन व पितरांना दक्षिणाभिमुख होऊन तर्पण करायचे असते.
इ. `देवांचे तर्पण सव्याने, ऋष्यादिकांचे निवीताने व पितरांचे अपसव्याने करावे', असे शास्त्र आहे.
ई. तर्पणासाठी दर्भाची आवश्यकता असते. दर्भाच्या अग्रावरून देवांचे, दर्भ मध्यावर दुमडून ऋषींचे आणि दोन दर्भांच्या मुळावरून व अग्रावरून पितरांचे तर्पण करावे.
उ. हाताच्या बोटांच्या अग्रभागी असलेल्या देवतीर्थाने देवांना, अनामिका व कनिष्ठा यांच्या मुळांतून ऋषींना आणि तर्जनी व अंगठा यांचा मध्यभाग यांतून पितरांना उदक द्यावे (तर्पण करावे).
ऊ. देवांना प्रत्येकी एक, ऋषींना दोन व पितरांना तीन अंजली तर्पण द्यावे. मातृत्रयी असल्यास तीन अंजली, तर इतर स्त्रियांना एक अंजली तर्पण द्यावे.'
(`अंजली' या शब्दाचा मूळ अर्थ `ओंजळ', असा होतो. येथे मात्र `एक अंजली तर्पण द्यावे', म्हणजे `एकदाच तर्पण द्यावे', अशा अर्थाने `अंजली' हा शब्द वापरला आहे. - संकलक)

पितृतर्पण
१. व्याख्या : पितरांना उद्देशून दिलेले उदक म्हणजेच पितृतर्पण होय. जीवत्पितृकाला पितृतर्पणाचा निषेध आहे.
२. का करावे ? : पितरांना वंशजांकडून जशी पिंडाची व ब्राह्मणभोजनाची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे उदकाचीही असते.
३. महत्त्व : तर्पण केल्याने पितर नुसते संतुष्ट होऊन निघून जात नाहीत, तर तर्पण करणार्‍याला आयुष्य, तेज, ब्रह्मवर्चस्व, संपत्ती, यश व अन्नाद्य (भक्षण केलेले अन्न पचविण्याचे सामर्थ्य) देऊन तृप्‍त करतात.
४। कधी करावे ?
अ. देव, ऋषी व पितर यांना उद्देशून नित्य (दर दिवशी) तर्पण करावे. नित्य तर्पण हे पहाटे स्नान झाल्यावर करावे. पितरांसाठी दररोज श्राद्ध करणे शक्य नसल्यास निदान तर्पण तरी करावे.
आ. पार्वण श्राद्ध केल्यानंतर दुसर्‍या दिवशी पितृतर्पण करावे.

५. तीलतर्पण :
पितृतर्पणात तीळ घ्यावेत. तिळांचे काळे व पांढरे असे दोन भेद असून, काळे तीळ श्राद्धप्रसंगी वापरावे. तीळ न मिळाल्यास त्यांच्या ऐवजी सोने किंवा रुपे वापरावे.
अ.`तीलमिश्रित जलाने पितरांना केलेल्या तर्पणाला तीलतर्पण म्हणतात.
आ.जेवढ्या पितरांना उद्देशून श्राद्ध केलेले असेल, तेवढ्यांनाच उद्देशून श्राद्धांग तीलतर्पण करायचे असते.
इ.दर्शश्राद्ध असता, त्याच्या पूर्वी व प्रतिसांवत्सरिक श्राद्ध असता, त्याच्या दुसर्‍या दिवशी तीलतर्पण करतात. इतर श्राद्धांत ते श्राद्धविधीनंतर लगेच करतात.
ई.नांदीश्राद्ध, सपिंडीश्राद्ध इत्यादी श्राद्धांत तीलतर्पण करत नाहीत.'

६. तीलतर्पणाचे महत्त्व
अ. `पितरांना तीळ प्रिय आहेत.
आ. तिळांचा उपयोग केल्याने असुर श्राद्धविघात करीत नाहीत.
इ. श्राद्धाच्या दिवशी घरभर तीळ पसरावे, निमंत्रित ब्राह्मणांना तीळमिश्रित जल द्यावे व तिळांचे दान द्यावे.' - जैमिनीय गृह्यसूत्र (२.१), बौधायन धर्मसूत्र (२.८.८) व बौधायन गृह्यसूत्र (क्रमश:)

अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरील पुढील मार्गिकेला भेट द्या - विशेषांक :
पितृपक्ष व श्राद्धविधी

संदर्भ : सनातनचा ग्रंथ `श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)'.
ग्रंथ हवा असल्यास संपर्क : पनवेल - (०२१४३) २३३ १२०)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: