गणेशोत्सव विशेष - ७

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी झाली. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण गणपति व इतर देवता यांचे साम्य याविषयी माहिती जाणून घेऊया.
१३. गणपति व इतर देवता
१३ अ. शिव व गणपति :
`सांप्रत गणपतीला आपण शिवपरिवारातला आणि शिवपुत्र मानतो; पण अशी ही एक कल्पना आहे की, शिव आणि श्री गणेश या देवता पूर्वी एकरूपच होत्या; जो शिव तोच श्री गणेश आणि जो श्री गणेश तोच शिव होता. श्री गणपति अथर्वशीर्षात गणेशाला उद्देशून `त्वं ब्रह्मा त्वं विष्णु: त्वं रुद्र: ।', असे म्हटले आहे.
श्री गणेश व शिव यांचे साम्य व सामर्थ्य सहज कळावे इतके ठळक आहे. भालचंद्र, तृतीयनेत्र व नागभूषणे ही शिवाची तीन वैशिष्ट्ये श्री गणेशमूर्तीतही आढळतात. श्री गणेशाला भालचंद्र असे नाव आहे. `गजवदनमचिंत्यम्' या श्री गणेशाच्या ध्यानश्लोकात त्याला त्रिनेत्रीही म्हटले आहे. तसेच श्री गणेशाच्या कमरेभोवती नागबंधही आहे. शंकराने हालाहल प्राशन केल्यानंतर तज्जन्य दाह शांत करण्यासाठी सूर्यभूषणे घातली व मस्तकी चंद्र धारण केला, अशी कथा आहे. श्री गणेशाबद्दलही अशीच कथा गणेशपुराणात आढळते. अनलासुर अग्नीरूपाने जग जाळीत होता, तेव्हा त्याचे श्री गणेशाने भक्षण केले; मग त्याचा दाह शांत करण्यासाठी देवांनी श्री गणेशावर सर्प, चंद्र इत्यादी शीतलोपचार केले.'

१३ आ. हनुमान व श्री गणपति : या दोघांचा रंग लाल आहे. या दोघांकडे अष्टमहासिद्धी आहेत. हनुमानाला रुई वहातात, तर श्री गणपतीला पांढरी रुई, म्हणजे मंदार, याची पत्री वहातात.

१३ इ. ओंकार (ॐ) व गणपति : `सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार सांगतांना, सृष्टीच्या उत्पत्तीच्या प्रारंभी `ॐ इतिध्वनिरभूत्' म्हणजे `ॐ' असा ध्वनी झाला. या ध्वनीचे दृश्यस्वरूप `सवै गजाकर: ।', म्हणजे तो ध्वनी, म्हणजेच ओंकार हा हत्तीच्या मुखासारखा आहे, असे सांगितले आहे. म्हणजे प्रथमत: ध्वनी झाला व तो `ॐ' असा झाला. हा ओंकार उभा करून पहा, म्हणजे `तो गणपतीच्या मुखासारखा आहे', हे लक्षात येईल. तात्पर्य, ॐ व श्री गणपति हे एकच आहेत, भिन्न नाहीत; म्हणून ओंकाराला नमन म्हणजेच गणपतीला नमन. सृष्टीच्या प्रारंभी ॐ व अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाचा कंठ भेदून बाहेर आले.
ओंकारश्चाथशब्दश्च द्वावेतौ ब्रह्मण: पुरा ।
कंठं भित्वा विनिर्यातौ तस्मान्मांगलिकावुभौ ।।
म्हणून हे दोन शब्द मंगलवाचक आहेत, असे म्हटले आहे. ओंकार हे
श्री गणपतीचे स्वरूप आहे.' (?)

१३ ई. कुंडलिनी व गणपति : श्री गणपति अथर्वशीर्षात ऋषींनी गणेशाचे वर्णन `मूलाधारस्थितोऽसि नित्यं', म्हणजे `तू शरिरातील मूलाधारचक्राच्या ठिकाणी नित्य रहातोस', असे केले आहे. श्री गणेश ही मूलाधारचक्राची देवता समजली जाते. मूलाधारचक्र व त्यातील कमळ ही दोन्ही लाल रंगाची आहेत. श्री गणपतीचा रंगही लाल आहे. मूलाधार हे षट्चक्रांतील आरंभीचे चक्र असून आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ मूलाधारचक्र जागृत झाल्यावर होतो. तसेच कोणत्याही कार्यारंभी श्री गणपतीची पूजा करतात.
(समाप्त)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: