पितृपक्षाबद्दलची माहिती व त्याचे महत्त्व

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
१५.९.२००८ ते २९.९.२००८ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने आपण पितर व श्राद्ध यांविषयीची माहिती जाणून घेऊया.

चातुर्मासात आपण बरेच सण व उत्सव साजरे करतो. त्यांपैकी बर्‍याच `सणांची शास्त्रीय माहिती, ते साजरे करण्याचे महत्त्व' या धर्मसत्संगांच्या मालिकेत यापूर्वीच्या भागांत आपण पाहिले. आज आपण पहाणार आहोत याच चातुर्मासाच्या कालावधीत केल्या जाणार्‍या एका महत्त्वाच्या विधीबद्दल. हा विधी म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या तृप्‍तीकरीता केला जाणारा श्राद्धविधी. हल्लीच्या काळात सण व उत्सव उत्साहात साजरे केले जातात; मात्र आपल्याच पूर्वजांच्या शांतीसाठी कर्तव्य म्हणून श्राद्ध करणे आवश्यक असतांनादेखील हा विधी करतांना समाजात कोणी फारसे आढळत नाहीत. बर्‍याच जणांना `हा विधी करणे म्हणजे वेळ व पैसा यांचा अपव्यय करणे', असेच वाटते. अगदी आस्तिक असणारी माणसेही `आमचा देवावर विश्‍वास आहे; पण आता जग एवढे पुढे गेले असतांना, श्राद्ध वगैरे करणे आम्हाला काही पटत नाही', असे म्हणतांना आढळतात. याचे कारण म्हणजे या विषयाचा त्यांचा काहीच अभ्यास नसणे व श्राद्धाबद्दल असलेले गैरसमज. आपल्याला कौटुंबिक जीवनात होणारे बरेच त्रास हा विधी न केल्याने होत असतात. हे त्रास कोणते, ते त्रास श्राद्ध केल्याने कसे दूर होतात, म्हणजेच श्राद्धविधी करण्याचे महत्त्व काय व हा विधी केल्याने आलेल्या अनुभूती आपण आजच्या भागात पहाणार आहोत.

२ अ १. ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले `मृत्यू व त्यानंतरची गती' यांविषयीचे शास्त्र मृत्यूनंतर एखाद्याचे अस्तित्व असू शकते, हेच मुळात आजच्या काळात विज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानणार्‍या अनेकांना पटत नाही. `जे स्थूल डोळयांना दिसते, तेवढेच जग', असे म्हणणार्‍या विज्ञानवाद्यांना श्राद्ध वगैरे करणे पटत नाही. हे लोक सर्वतोपरी विज्ञानाने सिद्ध केलेल्या गोष्टींवरच विश्‍वास ठेवतात.
माणूस मेला की पुढे त्याचे काय होते ? मरण हे जीवनाचे शेवटचे टोक आहे का कि मृत्यूनंतरही जीवन असते, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे विज्ञान आजपर्यंत तरी देऊ शकलेले नाही. मात्र आता विज्ञानही या अनुत्तरित प्रश्‍नांची उत्तरे शोधत आहे. बुद्धीच्या पलीकडचे हे शास्त्र ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले असतांना, वैज्ञानिक आता त्याला बुद्धीच्या आधारे सिद्ध करू पहात आहेत !
लंडनमध्ये नुकतीच एक जागतिक परिषद झाली. त्यामध्ये वैद्यकीयदृष्ट्या मृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या; पण नंतर पुन्हा जिवंत झालेल्या बर्‍याच लोकांच्या विचित्र अनुभवांवर चर्चा करण्यात आली. अशा प्रकारे पुन्हा जिवंत झालेल्या तब्बल १० टक्के लोकांनी बेशुद्धावस्थेत किंवा मृतावस्थेत आपल्याला आलेले अनुभव कथन केलेले आहेत. या घटनांचा विचार केल्यानंतर डॉक्टरांचे म्हणणे आहे की, विचारांचा जन्म मेंदूतून होत असेल, तर या मृत झालेल्या लोकांमध्ये कोणत्याही विचारांचा जन्म व्हावयास नको होता; पण तसे झालेले नाही. उलट त्यांनी त्या काळात
घडलेल्या सर्व घटनांचे इत्यंभूत वर्णन केले आहे. त्यामुळे माणूस मृत झाला, तरी त्याचे विचार चालू ठेवणारी एखादी शक्‍ती त्याच्या शरिरात असावी.
विज्ञानाला आता लागलेल्या या शोधाविषयीचे ऋषीमुनींनी सांगितलेले शास्त्र असे आहे - `स्थूलदेहाला सोडून लिंगदेह शरिराबाहेर पडला, तरी मनोदेह व कारणदेह कार्यरत रहात असल्यामुळे ती व्यक्‍ती मन व बुद्धी यांच्या आधारे विचार करू शकते.'
माणूस मृत झाल्यावर त्याचा पुढचा प्रवास कसा होतो, त्या प्रवासावर त्याच्या मनावरील संस्कारांचा काय परिणाम होतो, तसेच मृत्यूच्या वेळी मनात एखादी वासना अतृप्‍त राहिल्यामुळे पुढील प्रवासास होणारा अडथळा व त्यावर उपाय म्हणून श्राद्ध करण्याची आवश्यकता का आहे, या सर्वांविषयीचे शास्त्र कैक हजार वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी अत्यंत सविस्तररीत्या लिहून ठेवले आहे. त्याचे महत्त्व आता तरी विज्ञानवाद्यांनी समजून घेतले, तर त्यांना बुद्धीने न सोडवता आलेल्या कितीतरी समस्या ते सहज सोडवू शकतील.

२ अ २. श्राद्धविधी करणे, म्हणजे कर्तव्यपालन ! भारतीय संस्कृतीचे हे वैशिष्ट्य आहे की, धर्मपालन व कर्तव्य म्हणून निकटवर्तियांची जिवंतपणी सेवासुश्रुषा करणे व त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना चांगली गती मिळावी म्हणून श्राद्धविधी करणे. याउलट पाश्चिमात्य देशांत आई-वडील म्हातारे झाले की, त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात व नंतर त्यांची साधी चौकशीही करीत नाहीत !

२ अ ३. श्राद्धपक्ष
यासाठीच चातुर्मासातील भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षात, म्हणजेच श्राद्धपक्षात पितरांचे श्राद्ध करावे. या पक्षाला `पितृपक्ष', असेदेखील म्हटले जाते. या काळात पितर श्राद्धात अर्पण केलेले अन्न ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर येतात. या पक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्‍त रहातात. भाद्रपद अमावास्येला, म्हणजेच सर्वपित्री अमावास्येला सर्व पितरांना उद्देशून श्राद्ध करावे.

२ अ ४. श्राद्धपक्ष दरवर्षी करणे महत्त्वाचे
प्रत्येक वर्षी श्राद्ध करून त्या त्या लिंगदेहांभोवती असलेले वासनात्मक कोषांचे आवरण कमी करून त्यांना हलकेपणा प्राप्‍त करून देऊन मंत्रशक्‍तीच्या ऊर्जेवर त्यांना गती देणे, हे पितृऋण फेडण्याचे प्रमुख साधन आहे. सर्वच लिंगदेह साधना करणारे नसल्याने त्यांना बाह्य ऊर्जेच्या बळावर श्राद्धादी कर्मे करून पुढे ढकलावे लागते; म्हणून प्रत्येक वर्षी श्राद्धकर्म करणे महत्त्वाचे ठरते.

२ अ ५. पितरांची कृपा आवश्यक
आपल्याला जीवनात देवांच्या कृपेइतकीच पितरांची कृपाही आवश्यक असते. `पितर रागावलेल्या कुटुंबात शांती नसते. त्या कुटुंबातील व्यक्‍तींना जुनाट रोग होतात', असे शास्त्रात सांगितले आहे.

२ अ ६. श्राद्धविधी करण्याचे महत्त्व

आज विज्ञानाने बर्‍याच सुखसोयी उपलब्ध करून दिल्या असूनसुद्धा पूर्वीपेक्षा हल्लीच्या काळात कौटुंबिक समस्या व दु:ख यांचे प्रमाण वाढलेले दिसते. घरात सातत्याने भांडणे होणे, एकमेकांशी न पटणे, नोकरी न मिळणे, एखाद्याला गंभीर आजार होणे, सर्व परिस्थिती अनुकूल असूनदेखील लग्न न होणे, घरातील कर्ती व्यक्‍ती व्यसनाधीन होणे यांसारख्या अनेक समस्या आढळून येतात. या समस्यांचे निराकरण करणे प्रगत विज्ञानालाही शक्य नाही; कारण या समस्यांच्या मूळ कारणांचा शोध विज्ञानाला घेता येत नाही.
पूर्वीच्या काळी सर्व घरांत श्राद्धविधी कर्तव्य म्हणून नित्यनेमाने केले जात असल्याने पूर्वज संतुष्ट रहायचे. त्यामुळे कौटुंबिक कलह वा समस्या यांचे प्रमाण त्यामानाने कमी होते. आजच्या काळात वाढलेल्या या समस्यांचे एक कारण `पूर्वज संतुष्ट नसणे', हे असते; म्हणजेच आपण श्राद्धविधी न केल्याने त्यांना पुढची गती मिळत नाही व त्याचीच जाणीव करून देण्यासाठी ते आपल्याला त्रास देतात. आपला धर्माचा अभ्यास नसल्याने, तसेच श्राद्धविधीमागील शास्त्र व त्याचे महत्त्व माहिती नसल्याने त्रास असण्यामागील हे कारण आपल्याला कळत नाही. आपण या समस्यांचे निराकरण आपल्या बुद्धीला पटेल त्या मार्गाने करायला जातो; पण शेवटी पदरी अपयशच येते. अशाच अपयशी ठरलेल्या अनेकांनी उपाय म्हणून श्राद्धादी विधी केल्याने त्यांचे त्रास दूर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

२ अ ७. उद्देश
पितरांची पूजा करणे, हा धर्माचाच एक भाग मानला गेला आहे. पितरांना सद्‌गती लाभावी, त्यांनी पितृलोकातून वंशावर कृपादृष्टी ठेवावी, जे पितर पितृलोकात न जाता भूतयोनीत गेले असतील आणि जे वंशातल्या किंवा कुळातल्या लोकांना बाधा करीत असतील, त्यांची ती बाधा दूर व्हावी, त्याबरोबरच त्यांचा उद्धार व्हावा, असे बहुविध उद्देश पितृपूजा केल्याने सफल होतात.

२ अ ८. फलप्राप्‍ती
स्मृतिचंद्रिका व इतरही अनेक ग्रंथांत `आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, लक्ष्मी, पशू, सौख्य, धन, धान्य या गोष्टी पितृपूजनाने म्हणजेच श्राद्ध केल्याने प्राप्‍त होतात', असे सांगितले आहे.

२ अ ९. कोणी करावे ?
२ अ ९ अ. क्रम : मुलगा, मुलगी, नातू, पणतू, पत्‍नी, मालमत्ता घेणारा मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या व धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड, समानोदक, शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्‍याने श्राद्ध करावे.

२ अ ९ आ. स्वत: करणे महत्त्वाचे : खरे म्हणजे हा विधी स्वत: करायचा असतो. तो स्वत:ला येत नाही म्हणून आपण ब्राह्मणाकडून करवितो.

२ अ ९ इ. विभक्‍त कुटुंब असल्यास : एकत्र कुटुंबात कर्त्या वडील पुरुषाने श्राद्धे करावीत. विभक्‍त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धे करावीत.

२ अ १०. श्राद्ध मन लावून करणे
मनात विविध विचार सुरू असतील, तर विधी परिणामकारक होत नाही. त्यामुळे पितरांना श्राद्धाचा लाभ कमी प्रमाणात होतो. माणसाचे मनोव्यापार सुरू असले की, त्याचा वासनादेह व मनोदेह यांतून बाहेर पडणार्‍या स्पंदनांचा मृत माणसाच्या मनावर पुष्कळ परिणाम होतो; म्हणून श्राद्ध करतांना ते मन लावून व नीटनेटके केले पाहिजे.

२ अ ११. अन्न किती काळ पुरते ?पितृपक्षात अर्पण केलेले अन्न पितरांना दुसर्‍या पितृपक्षापर्यंत, म्हणजे वर्षभर पुरते.

२ अ १२. श्राद्धविधी अमुक एक कारणाने करू शकत नाही, असे कोणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदु धर्म !श्राद्ध करण्यात येणार्‍या अडचणी दूर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. या सर्व पद्धतींवरून एकच लक्षात येते की, दरवर्षी येणार्‍या श्राद्धाच्या दिवशी किंवा श्राद्धपक्षात पितरांना उद्देशून कोणत्यातरी प्रकाराने श्राद्ध केलेच पाहिजे, त्याशिवाय राहू नये, हाच त्यातला मुख्य उद्देश आहे. तरीही इतके मार्ग असूनही आजकाल हिंदू श्राद्ध वगैरे करत नाहीत. अशांना कोण मदत करू शकणार ?
सर्वांत प्राचीन धर्म असून व सर्वांत आधी इतका सखोल अभ्यास करून फक्‍त हिंदु धर्मानेच या विधींचे शास्त्र सांगितलेले असूनही आज बहुसंख्य हिंदू हे विधी करत नाहीत. याचे कारण आपला धर्माचा अभ्यास नसणे व आपली आपल्याच धर्मावर श्रद्धा नसणे.
दत्ताच्या नामजपामुळे पूर्वजांचे होणारे त्रास कसे कमी होतात, यांसंदर्भातील माहिती आपण पुढील धर्मसत्संगात पाहूया.
आपल्यापैकी अनेकांच्या घरांत भांडणे होणे, भयानक स्वप्न पडणे, निद्रानाशाचा त्रास असणे, साप दिसणे, सतत आजारपण असणे, व्यवसायात यश न येणे यांसारखे कमी-अधिक प्रमाणात पूर्वजांचे त्रास होत असतात. त्यांवर आपण बुद्धीने विचार करून आतापर्यंत बरेच उपाय केलेही असतील; मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्यास ते त्रास पूर्वजांमुळेच आहेत, हे नक्की होते. त्यावर जाणकार व्यक्‍तींचा सल्ला घेऊन उपाय म्हणून श्राद्धादी विधी करून घेतल्याने तुम्ही या त्रासांतून कायमची मुक्‍तता मिळवू शकाल. आतापर्यंत बर्‍याच जणांनी याचा अनुभव स्वत: घेतलेला आहे

संदर्भ : सनातन धर्मसत्संग ध्वनीचित्र-तबकडी `पितृपक्ष व महालय श्राद्ध' - ध्वनीचित्र-तबकडी हवी असल्यास संपर्क :
रत्नागीरी (०२३५२) २२२३४६

चिपळूण (०२३५५) २५३८०८

मुंबईः २४०९००२७

ठाणेः ९३२२६५२५८०

रायगडः २७४५०३३८

पुणेः ९४२२४३७१३४

जळगावः ९४२३०५६४०३

संभाजीनगरः ९४२२४३७१३१

नाशिकः ९४२२४४१७८२













वरील माहितीची `मार्गिका' (`लिंक') आपण संगणकीय पत्राद्वारे नातेवाईक व मित्रमंडळी यांना पाठवून या अध्यात्मप्रसारात सहभागी व्हावे.

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: