श्राद्ध कोणी करावे ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. पितृपंधरवडा म्हणजे आपल्या कुळातील ज्या पितरांना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधीद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देण्याची संधी. विधी म्हटले की, तो विधी कोणी करावा, कधी करावा, कोठे करावा, यांसारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. या प्रश्नांची उत्तरे या सदरातून आपल्याला मिळतील. आज आपण श्राद्ध कोणी करावे, या संदर्भातील माहिती पाहूया.

१. स्वत: करणे महत्त्वाचे : `श्राद्धविधी स्वत: करायचा असतो. तो स्वत:ला करता येत नाही; म्हणून आपण ब्राह्मणाकडून करवितो. आता श्राद्ध करणारे ब्राह्मणही मिळेनासे झाले आहेत. यावर उपाय म्हणून श्राद्ध-संकल्पविधीच्या पोथ्या मिळतात. त्या आणून प्रत्येकाने श्राद्ध-संकल्पविधी पाठ करावा. हा पाठ संस्कृत भाषेत असतो. आपण अन्य भाषा शिकतो, मग संस्कृत तर देवभाषा आहे, तसेच ती आपल्याला सहज येण्यासारखीही आहे.
(वरील मुद्दा तत्त्वत: योग्य असला, तरी संस्कृत भाषेतील उच्चारांतील काठिण्य, शास्त्रात सांगितलेला विधी नीट आकलन होण्याची मर्यादा इत्यादी पहाता स्वत: श्राद्धविधी यथासांग पार पाडणे, हे प्रत्येकाच्याच बाबतीत शक्य होईल असे नाही. अशांनी ब्राह्मणाकरवी व ब्राह्मण न मिळाल्यास एखाद्या जाणकाराकरवी श्राद्धविधी करण्यास हरकत नाही. श्राद्धविधी होणे हे जास्त आवश्यक आहे, हे येथे लक्षात घ्यावे. - संकलक)

२. श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करणे आवश्यक असणे : पूर्वजांची स्पंदने व त्यांच्या सर्वांत जवळच्या वारसदारांची स्पंदने, यांमध्ये खूप साधर्म्य असते. एखादा सूक्ष्म-देह वेदना अनुभवत असतो, तेव्हा त्या त्रासाची स्पंदने त्याचा सर्वांत जवळचा वारसदारही अनुभवत असतो. याच कारणास्तव श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करायचे असतात. मुलाची स्पंदने व पितरांची स्पंदने एकसारखीच असल्यामुळे श्राद्धतर्पणाच्या वेळी मुलाने दिलेले तर्पण पितरांना ग्रहण करणे सुलभ होते.

३. श्राद्धविधी अमूक एक व्यक्‍ती करू शकत नाही, म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदु धर्म ! : मुलगा (उपनयन न झालेलाही), मुलगी, नातू, पणतू, पत्‍नी, संपत्तीत वाटेकरी असणार्‍या मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या व धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड (सात पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही), समानोदक (सात पिढ्यांनंतरचे गोत्रातील कोणीही), शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्‍याने श्राद्ध करावे.

एकत्र कुटुंबात कर्त्या वडीलपुरुषाने (कुटुंबात वयाने मोठ्या किंवा सर्वांच्या पालनपोषणाची जबाबदारी असलेल्या व्यक्‍तीने) श्राद्धे करावीत. विभक्‍त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धे करावीत.'
प्रत्येक मृत व्यक्‍तीसाठी श्राद्ध केले जाईल व त्याला सद्‌गती मिळेल, अशी पद्धत हिंदु धर्माने तयार केली आहे. `एखाद्या मृत व्यक्‍तीचे कोणीही नसल्यास त्याचे श्राद्ध करण्याचे कर्तव्य राजाचे असते', असे धर्मसिंधु या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे.
(इतके मार्ग असूनही हिंदू श्राद्ध वगैरे करत नाहीत. मग अशा हिंदूंना कोण मदत करू शकणार ? - संकलक)

४. स्त्रियांनी श्राद्ध करणे
अ. मुद्दा `३' मध्ये मुलगी, पत्‍नी, आई व सून यांनाही श्राद्ध करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी सांप्रत काळी श्राद्ध सांगणारे काही पुरोहित स्त्रियांना श्राद्ध करायला संमती देत नाहीत. याचे कारण असे की, पूर्वी स्त्रियांचे मौजीबंधन होत असे. हल्ली मात्र स्त्रियांच्या बाबतीत हा संस्कार सर्वच वर्णांमध्ये बंद झाल्यामुळे त्याला अनुसरून स्त्रियांनी श्राद्ध करणे, हेही बंद झाले; मात्र आपत्काळात, म्हणजेच श्राद्ध करण्यास कोणीही उपलब्ध नसल्यास श्राद्ध न करण्यापेक्षा स्त्रियांनी श्राद्ध करावे.

आ. श्राद्धकर्तीने सव्य-अपसव्य करतांना स्वच्छ सुती हातरूमाल खांद्यावर घ्यावा. (क्रमश:)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)'.
ग्रंथ हवा असल्यास संपर्क : पनवेल - (०२१४३) २३३ १२०)

--------------------------------------------------------------------------------

सनातनने `पितृपक्ष व महालय श्राद्ध' ही ध्वनीचित्र-तबकडी प्रसारित केली आहे. त्या ध्वनीचित्र-तबकडीत दाखवल्याप्रमाणे श्राद्धविधी केल्याने ज्यांना अनुभूती आल्या असतील, त्यांनी त्या त्वरित नजीकच्या सत्संगात पाठवाव्यात.

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: