श्राद्धविधीशी संबंधित शंकानिरसन

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
`चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण' या सदरात श्राद्धाविषयी माहिती देण्यात येत आहे. तरीही काही जणांनी श्राद्धविधीबाबत असलेल्या अडचणी मांडल्या आहेत. या अडचणींचे निरसन होऊन त्यांना श्राद्धविधी करता यावा, यासाठी त्यावरील उपाय येथे देत आहोत.


श्राद्धविधी करण्यासाठी पुरोहित मिळत नाहीत. अशा वेळी काय करावे ?कोणत्याही गोष्टीसाठी पूर्वनियोजन असावे लागते. कमीतकमी १ महिना अगोदर पुरोहित शोधायला लागल्यास निश्चित मिळतात. आपल्या गावात पुरोहित उपलब्ध नसल्यास दुसर्‍या गावातील पुरोहितांना बोलावू शकतो. एवढे करूनही पुरोहित मिळत नसल्यास श्रीविष्णूला व श्रीदत्तगुरूंना शरण जाऊन प्रार्थना करावी व किमान श्राद्ध विधीतील पुढील भाग आचरणात आणावा.
. जेवण बनवून देवाला नैवेद्य दाखवावा.
. एका पानावर जेवण वाढून ते पान गाईला द्यावे.
. एका पानावर जेवण वाढून ते पान कावळयाला द्यावे व हातपाय धुवून घरात यावे. (शक्य असल्यास काही पुरुष, स्त्रिया व मुले यांना भोजन द्यावे.)
( टीप : वरील विधीच्या जोडीला सुरुवातीला श्री दत्तगुरूंचे छायाचित्र स्वच्छ पुसलेल्या चौरंगावर ठेवून फूल व तुळस वहावी, उदबत्ती ओवाळावी व तीन तास `श्री गुरुदेव दत्त' हा नामजप करावा.)

घरातील व्यक्‍तीचे निधन होऊन १ वर्ष पूर्ण न झाल्यास, त्या कुटुंबातील मंडळींनी महालय श्राद्ध, तसेच सांवत्सरिक श्राद्ध करावे का ?
महालय श्राद्ध हे केवळ एका व्यक्‍तीसाठी नसून सर्व पूर्वजांसाठी आहे. निधन झालेल्या व्यक्‍तीचा उल्लेख पुढच्या वर्षीच्या महालयात येतो. त्यामुळे सांवत्सरिक व महालय श्राद्ध केलेच पाहिजे. ते न करून चालत नाही.
(टीप : काही जण श्राद्ध, तसेच इतर धार्मिक विधी यांबद्दल लोक बोलतात त्याप्रमाणे करतात. या वेळी शास्त्र काय सांगते यावर विश्‍वास ठेवावा. लोकांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवू नये. )

भाद्रपद कृष्ण चतुर्दशीला कोणाचे श्राद्ध करावे ?व्यक्‍तीचा मृत्यू शस्त्राने झाला असेल, व्यक्‍तीला युद्धात वीरमरण आले असेल किंवा कोणत्याही घातपातामुळे मृत्यू झाला असेल, त्यांचे महालय श्राद्ध भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीवर करावे व सांवत्सरिक श्राद्ध ज्या महिन्यात व ज्या तिथीला ते निवर्तले असतील, त्या तिथीवर करावे.
(टीप : यासंदर्भात अधिक माहिती सनातनच्या `श्राद्ध' (महत्त्व व शास्त्रीय विवेचन) या ग्रंथात दिली आहे.)

- सनातनचे साधक-पुरोहित श्री. दामोदर वझे

साभार : पितृपक्ष व श्राद्धविधी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: