गणेशोत्सव विशेष - ५

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी झाली. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण ज्येष्ठ गौरी हे व्रत करण्याची पद्धत व अनंत चतुर्दशी यांविषयी शास्त्रोक्‍त माहिती जाणून घेऊया.


ज्येष्ठा गौरी
१. तिथी : `भाद्रपद शुद्ध अष्टमी२. इतिहास व उद्देश :
असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्री महालक्ष्मी गौरीला शरण गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. श्री महालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्‍त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.

व्रत करण्याची पद्धत
अ. हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री लक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात.

आ. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात.

इ. तिसर्‍या दिवशी गौरीचे नदीत विसर्जन करतात व परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.'

अनंत चतुर्दशी

१. तिथी : भाद्रपद शुद्ध चतुर्दशी
२. उद्देश : मुख्यत:
हे व्रत गतवैभव परत मिळावे याकरिता केले जाते.
३. व्रत करण्याची पद्धत : या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष व यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताची सुरुवात कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात व मग ते त्या कुळात चालू रहाते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्‍त असल्यास विशेष लाभदायक ठरते. (क्रमश:)

संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणपति'

नागरिकांना आवाहन !आपल्या परिसरातील वा आपल्याला माहीत असलेल्या गणेशोत्सव मंडळांकडून गैरप्रकार होत असल्यास त्याला विरोध न करणे म्हणजे याला मूकसंमती देणे होय. धर्माच्या दृष्टीकोनातून धर्मद्रोही कृत्ये करणारा व त्याला मूकसंमती देणारा, हे दोघेही सारखेच गुन्हेगार ठरतात. गैरप्रकार घडू नयेत, यासाठी आपण समाजाचे घटक आहोत, हे लक्षात ठेवून चुकीच्या गोष्टींविरुद्ध कृती करावयास हवी !

उद्याच्या खंडणीबाजांच्या विरोधात आजच कृती करा !
गणेशोत्सवातील निधीसंकलनाच्या वेळी करण्यात येणार्‍या जबरदस्तीच्या विरोधात कृती करणे, हे प्रत्येक देशप्रेमी नागरिकाचे, तसेच पोलिसांचे कर्तव्य आहे. आज धार्मिक उत्सवाची वर्गणी जमा करतांना लोकांवर जबरदस्ती करणार्‍यांमधून पुढे खंडणीबाज निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घ्या. जबरदस्तीने वर्गणी मागणार्‍यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करा !

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: