मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र ?
मारुतीला प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र ?
मारुतीचा जप करण्यामागील शास्त्र ?
मारुतीला तेल वाहाण्यामागील शास्त्र ?

मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. नारळ हा चांगल्या तसेच वाईट, अशा दोन्ही प्रकारच्या लहरी आकर्षित व प्रक्षेपित करू शकतो. नारळ अर्पण करण्यापूर्वी मारुतीच्या मूर्तीसमोर नारळाची शेंडी धरावी व मारुतीची सात्त्विक स्पंदने नारळात यावीत यासाठी मारुतीची प्रार्थना करावी।त्यानंतर नारळ वाढवून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा व राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवतेला अर्पण करावा. यामुळे स्थानदेवतेच्या माध्यमातून देवळाच्या परिसरातील त्रासदायक शक्‍ती व कनिष्ठ भुते यांना उतारा मिळून तीही संतुष्ट होतात. नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने मारुतीच्या सात्त्विक लहरींचा लाभ होतो। काही भाविक देवाला नारळ पूर्णत: अर्पण करून टाकतात। नारळ पूर्णत: अर्पण करून टाकल्याने त्यांच्या मनात फक्‍त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते; त्यातून त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही। यासाठी शक्यतो देवाला पूर्ण नारळ अर्पण करू नये। त्याऐवजी नारळ वाढवून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा व देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. एखाद्या व्यक्‍तीला वाईट शक्‍तीचा त्रास असल्यास तो दूर करण्यासाठी त्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवावा व त्यानंतर तो मारुतीच्या देवळात फोडावा. व्यक्‍तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्‍तीतील वाईट शक्‍ती नारळात येते व तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी वाईट शक्‍ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करावा

मारुतीला प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र ?
मारुतीचे पंचतत्त्वांवर आधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून मारुतीच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा नेहमी घड्याळाच्या काट्यांच्या दिशेनेच घालावी. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा जास्त घालायच्या असल्यास त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने देवाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य कमी कालावधीत संपूर्ण शरीरात संक्रमित होते.

मारुतीचा जप करण्यामागील शास्त्र ?
मारुतिस्तोत्रात `भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तही । नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शने ।।', अशी मारुतीची महती गायली आहे. मारुति हा सर्वशक्‍तीमान असल्यानेच त्याला भूत, पिशाच, राक्षस, समंध इत्यादी कोणत्याही आसुरी शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत.
लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. आसुरी शक्‍तींपासून रक्षण होण्यासाठी मारुतीची उपासना म्हणूनच विशेष फलदायी ठरते. व्यक्‍तीला आसुरी शक्‍तींचा त्रास असल्यास तो दूर होण्यासाठी तिला मारुतीच्या देवळात नेणे, तिच्यावरून नारळ उतरवून मग तो नारळ मारुतीच्या देवळात फोडणे, तिला मारुतिस्तोत्र म्हणण्यास सांगणे, तिला मारुतीचा नामजप करण्यास सांगणे यांसारखे उपाय करता येतात. मारुतीचा नामजप अखंड करणार्‍याला मारुतीची शक्‍ती व चैतन्य अखंड लाभल्याने त्याचे आसुरी शक्‍तींपासून सदैव रक्षण होते; म्हणून नामजप हा सर्व उपायांपैकी सर्वांत प्रभावी उपाय आहे.

मारुतीला तेल वाहाण्यामागील शास्त्र ?
मारुतीच्या उपासनेने शनिग्रहपीडाही दूर करता येते. याचा विधी याप्रमाणे आहे. एका वाटीत तेल घ्यावे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या तेलात स्वत:चा चेहरा पहावा. मग ते तेल मारुतीला वाहावे.
एखादी आजारी व्यक्‍ती जर मारुतीच्या देवळात जाऊ शकत नसली, तरीही याच पद्धतीने तिला पूजा करता येते. तेलात चेहर्‍याचे प्रतिबिंब पडते, तेव्हा वाईट शक्‍तीचेही प्रतिबिंब पडते. ते तेल मारुतीला वाहिल्यावर त्यातील वाईट शक्‍तीचा नाश होतो. मारुतीला वाहायचे असलेले तेल मारुतीच्या देवळाबाहेर बसलेल्या तेलविक्रेत्याकडून विकत न घेता घरून नेऊन वाहावे. याचे कारण म्हणजे एखादी व्यक्‍ती ज्या अनिष्ट शक्‍तीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी तेलविक्रेत्याकडून तेल विकत घेऊन ते मारुतीला वाहात असेल, ती अनिष्ट शक्‍ती त्या तेलविक्रेत्याला त्रास देण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तेल घरून नेऊन वाहावे.

(संदर्भ : सनातन-निर्मित `अध्यात्मशास्त्र' या ग्रंथमालिकेतील खंड ८ `विष्णु व विष्णूची रूपे')

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: