प्राचीन भारतीय वास्तूशास्त्राचे महत्त्व जाणा !

1 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
वास्तूशास्त्रप्राचीन भारतीय वास्तूशास्त्राचे महत्त्व जाणा !
माणूस हा घरात रमणारा प्राणी आहे. केवळ माणूसच नाही, तर प्रत्येक प्रत्येक जीव हा आपल्या घरट्यात सुख, समाधान, सुरक्षितता अनुभवतो. घर हे बांधावे लागते. ते आपोआप उभे रहात नाही. घराचे घरपण हे त्यात रहाणार्‍या माणसांवर अवलंबून असले, तरी त्या माणसांना माणुसकीने रहायला उद्युक्‍त करायला त्या वास्तूतील वातावरण प्रामुख्याने जबाबदार असते. वास्तूशास्त्र हे पुरातन शास्त्र आहे. महाभारत काळात मयासुराने बांधलेल्या मयसभेचा, तसेच इंद्रप्रस्थाचा उल्लेख आहे. मयानेही वास्तूशास्त्रात मोलाची भर टाकली आहे. वास्तूशास्त्र म्हणजे निसर्गावर आधारलेल्या अनेक शास्त्रांपैकी एक शास्त्र. नैसर्गिक दिशा, पृथ्वीच्या पोटातील चुंबक, भौगोलिक परिस्थिति यांचा शास्त्रीयदृष्ट्या वास्तू बांधण्यासाठी उपयोग म्हणजे वास्तूशास्त्र. सर्व चराचर सृष्टी ही आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी या पंचमहाभूतांनी व्यापलेली आहे. या पंचमहाभूतांपैकी प्रत्येकाचे गुण व कार्य निरनिराळे आहेत. यांपैकी आकाशतत्त्व हे शब्दगुणयुक्‍त असून जीव निर्माण करणे, कोणत्याही गोष्टीसाठी साधनांची उपलब्धता देणे, हे त्याचे कार्य आहे. वायूतत्त्व हे स्पर्शगुणयुक्‍त असून वहन, नियंत्रण आणि वितरण हे त्याचे कार्य आहे. तेजतत्त्व हे रूपगुणयुक्‍त असून शुद्धीकरण, दिशा देणे, अधिकार, नेतृत्व यासाठी ते उपयुक्‍त आहे. आप महाभूत हे रसगुणयुक्‍त असून तृप्‍ती, समाधान, पुष्टी, तुष्टी हे त्याचे कार्य आहे. पृथ्वीतत्त्व हे गंधगुणयुक्‍त असून संघटन, संयोजन या कामात ते महत्त्वाचे ठरते. वास्तूशास्त्र हे ज्योतिषशास्त्राप्रमाणेच प्राचीन आहे आणि ज्योतिषशास्त्रातील ग्रहांचे कारकत्व, त्यांचे पंचमहाभूतातील वर्गीकरण यांचा उपयोग वास्तूशास्त्रात केला आहे. त्याचे वर्गीकरण रवि, मंगळ-अग्नीतत्त्व, चंद्र, शुक्र-जलतत्त्व, गुरु-आकाशतत्त्व, शनि-वायूतत्त्व आणि बुध-पृथ्वीतत्त्व असे आहे. वेदकालापासून दशदिशांवर विविध देवतांचे स्वामित्व आणि त्यांच्या गुणानुसार कार्य सांगितले आहे. ते या क्रमाने आहे.

पूर्वदिशा : देवता - इंद्र, ग्रहाधिपति - रवि
अग्नेय : देवता - अग्निदेव, ग्रहाधिपति - शुक्र
दक्षिण : देवता - यम, ग्रहाधिपति - मंगळ
नैऋत्य : देवता - नैऋति, ग्रहाधिपति - राहु, केतु
पश्चिम : देवता - वरुण, ग्रहाधिपति - शनि
वायव्य : देवता - वायुदेव, ग्रहाधिपति - चंद्र
उत्तर : देवता - कुबेर, ग्रहाधिपति - बुध
आपल्यापैकी प्रत्येकाचे कार्य व गरजा हे पंचमहाभूते, अष्टदिशा यांच्या बाहेर नाही आणि वास्तूशास्त्रात याच गोष्टींचा प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे. आपण घरात ज्या वास्तूत रहातो, तेथील वातावरणाचे गुण आपण अंगिकारलेल्या कर्मासाठी, त्या कर्मानुसार मिळणार्‍या फळासाठी पोषक किंवा घातक असतात. ते जास्त शुभफलदायी व्हावे; म्हणून वास्तूशास्त्रात जमिनीचा आकार, जमिनीचा चढउतार, शल्यशोधन, माती परीक्षण, प्रवेशद्वार अशा विविध गोष्टींचा अभ्यास केला आहे. आपल्या घरात बैठकीची खोली, स्वयंपाकघर, शयनगृह, देवघर अशी विविध दालने असतात आणि त्या प्रत्येक खोलीत करावयाची कर्मे निरनिराळया गुणांची असतात; उदा. बैठकीच्या खोलीत चर्चा, खलबते, विचारविनिमय, निर्णय होतात. स्वयंपाकघरात उदरभरण, पुष्टी, तुष्टी ही कर्मे केली जातात. शयनगृहात विश्रांति, विषयसेवन ही कर्मे केली जातात, तर देवघरात विश्‍वास, शांतता, समाधान मिळत असते. अनुभवजन्य वास्तूशास्त्रानुसार असे सिद्ध झाले आहे की, नैसर्गिक दिशांच्या गुणांशी आपल्या कर्मगुणांची सांगड घालून घरातील विविध दालनांची विभागणी केल्यास कमी श्रमात जास्त यश पदरी पडते आणि या शास्त्राच्या विरुद्ध वर्तन केल्यास कष्ट करूनही अपयशाचे धनी व्हावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून घरातील विविध दालनांची विभागणी करावी.
१. स्नानगृह : कर्म - स्वच्छता - हे अग्नीतत्त्वाचे कार्य असल्यामुळे स्नानगृह पूर्वेला असावे.
२. स्वयंपाकघर : कर्म - चविष्ट पदार्थांची निर्मिती, तृप्‍ती - हे अग्नि (अग्निदेव) व जलतत्त्व (शुक्र) यांचे कार्य असल्यामुळे अग्नेय दिशेस असावे.
३. घरातील तिजोरी : कर्म - धनवृद्धी - हे पृथ्वीतत्त्व (बुध) आणि देवता (कुबेर) यांचे कार्य असल्यामुळे ती उत्तर दिशेकडे उघडणारी असावी. अशा प्रकारेच कार्यकारणभाव ठेवून इतर दालनेही पुढील दिशांना ठेवता येतील.
४. शयनगृह : दक्षिण
५. बैठकीची खोली : पूर्व
६. भोजनगृह : पश्चिम
७. धान्यगृह, कोठार : वायव्य
८. शौचालय : दक्षिण-अग्नेय किंवा पश्चिम-वायव्य
९. पाण्याची टाकी : उत्तर - इशान्य किंवा पूर्व-इशान्य
१०. दूरदर्शन संच, संगणक, इलेक्ट्रिक मीटर : आग्नेय
११. देवघर : इशान्य अशा प्रकारे अष्टदिशांना घरातील विविध दालनाची विभागणी केल्यास तेथील कार्यास गति मिळते. वास्तूशास्त्र हे फक्‍त रहावयाच्या घरांसाठीच मर्यादित नसून देवालये, दुकाने, कारखाने यांच्या उत्कर्षासाठीही त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो. आपल्या पूर्वजांनी सखोल अभ्यासाने संपन्न केलेल्या या शास्त्राच्या अनुकरणाने आपले आयुष्य सुखी, समृद्ध, संपन्न करूया !

अधिक माहिती वाचण्यासाठी येथे टिचकी मारा

1 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:

We Are said...

बहुत ही अच्छी जानकारी दी है,
इसी प्रकार के लेख प्रकाशित कर हमे अपने धर्म की जानकारी दे

धन्यवाद

राकेश