लाखापेक्षा अधिक श्लोकसंख्या असलेले महाभारत न थांबता सांगून ते श्लोक लिहिण्याबद्दल गणपतीची अट पुरी करणारे महर्षि व्यास !
`वेदव्यासांनी साक्षात् गणेशालाच आपला लेखक बनवले. त्यांना महाभारत लिहायचे होते. लाखापेक्षा अधिक श्लोकांचा प्रचंड असा तो महाग्रंथ महाभारत ! हा प्रचंड ग्रंथ कोण लिहिणार ? असा बुद्धिमान, प्रज्ञासंपन्न, ऋतंभरा, प्रज्ञेचा महापुरुष कसा लाभायचा ? व्यासांनी ग्रंथ लिहिण्यासाठी विद्येच्या देवतेची, गणेशाची प्रार्थना केली. गणपतीने काही अटींवर होकार दिला. त्या अटींप्रमाणे व्यासांनी सारखे श्लोक सांगत जायचे व कुठेही थांबायचे नाही. व्यास विचार करायला थांबले, तर गणपति लेखन थांबवेल व पुढे तो लिहिणार नाही. व्यासांनीही शर्त सांगितली, ``जे जे मी सांगेन, ते ते अर्थ ग्रहण करून समजून उमजूनच लिहायचे. केवळ अक्षरे कागदावर रेखाटायची नाहीत. अर्थाचे अनुसंधान साधूनच श्लोक लिहायचे.'' गणपतीने होकार दिला. व्यास जसे सांगत गेले, तसा गणपति अर्थानुसंधान राखत लिहीत गेला. व्यासांना विचार करायला सवडच सापडत नव्हती. व्यासही चतुर होते. पुढचे श्लोक मनात जुळवण्याकरिता त्यांना वेळ हवा असे, त्या वेळी ते कूटश्लोक सांगत. `श्लोकांचा अर्थ लवकर कळूच नये', असे कूटार्थाचे (दोन-दोन, तीन-तीन अर्थ करता येतील असे) श्लोक सांगत. असा कूटश्लोक आला की, गणपतीला विचार करावा लागे. तोवर व्यासांना सवड मिळत असे. व्यास नवे नवे श्लोक मनात रचत आणि सांगत. अशा रीतीने लाखापेक्षा अधिक श्लोकसंख्या असलेले महाभारत व्यासांनी सांगितले आणि गणपतीने लिहिले. महाभारतात जे नाही, ते जगात कुठेच नाही. `यन्न भारते, तन्न जगति ।' जगातले सर्वच्यासर्व सारस्वत वाड्मय हे व्यासांचे उच्छिष्ट आहे. `व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment