कलीयुगातील बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे मायेत खूप गुरफटलेले असतात. मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात अडकतात. आपल्या कुळातील अशा या अतृप्त लिंगदेहांना सद्गती प्राप्त करून देण्याचा एक मार्ग म्हणजे श्राद्धविधी. श्राद्धविधी म्हटला की, ते कोणी करावा, कोठे करावा, कधी करावा, यांसारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. काल आपण श्राद्ध कोठे करावे, याविषयी माहिती पाहिली. आज आपण श्राद्ध कधी करावे, या संदर्भातील माहिती पाहूया.
श्राद्ध कधी करावे ?
१. सर्वसाधारणत: योग्य तिथी : सर्वसाधारणत: अमावास्या, वर्षातल्या बारा संक्रांती, चंद्र-सूर्य ग्रहणे, युगादी व मन्वादी तिथी, अर्धोदयादी पर्वे, मृत्यूदिन, श्रोत्रिय ब्राह्मणांचे आगमन इत्यादी तिथी या श्राद्ध करण्यासाठी योग्य आहेत.
२. श्राद्धविधी अमूक एका काळी करू शकत नाही, म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदु धर्म !
२. अ. `सामान्यत: दरवर्षी मनुष्य मृत झालेल्या तिथीला (इंग्रजी दिनांकानुसार नाही, तर हिंदु पंचांगाप्रमाणे असलेल्या तिथीला) श्राद्ध करावे. मृत्यूतिथी माहीत नाही, पण फक्त महिना माहीत आहे, अशा वेळी त्या महिन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे.
२. आ. मृत्यूतिथी व महिना दोन्ही माहीत नसल्यास माघ किंवा मार्गशीर्ष अमावास्येला श्राद्ध करावे.
२. इ. निश्चित मृत्यूतिथी माहीत नसल्यास, मृत्यूची बातमी समजलेल्या दिवशी श्राद्ध करावे.
२. ई. पितरांचे श्राद्ध दररोज करायला पाहिजे. हे उदकाने, म्हणजे पितरांना तर्पण करूनही करता येते.
२. उ. पितरांचे श्राद्ध दररोज करणे अशक्य असल्यास दर्शश्राद्ध करावे. त्याने नित्य श्राद्धाची सिद्धी होते. दर्श म्हणजे अमावास्या. दर्शश्राद्ध म्हणजे दर महिन्याच्या अमावास्येला करावयाचे श्राद्ध.
२. ऊ. दर महिन्याला दर्शश्राद्ध करणे अशक्य असल्यास चैत्र, भाद्रपद व आश्विन या महिन्यांच्या अमावास्यांना तरी करावे.
२. ए. दर्शश्राद्ध चैत्र, भाद्रपद व आश्विन या महिन्यांच्या अमावास्यांना करणेही शक्य नसल्यास भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात महालय श्राद्धे तरी अवश्य करावीत. तेही अशक्य असल्यास भाद्रपद अमावास्येला (सर्वपित्री अमावास्येला) तरी श्राद्ध करावेच.'
(हिंदु धर्माने धर्माचरणात इतकी मुभा दिली असतांनाही हिंदू श्राद्ध वगैरे करत नाहीत. मग अशा हिंदूंना कोण मदत करू शकणार ? - संकलक)
३. दिवसातील योग्य काल : दिवसाचे पाच भाग केल्यावर त्यांतल्या चौथ्या भागाला `अपराण्ह', असे म्हणतात. हा काल श्राद्धाला योग्य समजावा.
४. श्राद्ध करण्यासाठी असलेल्या विशेष तिथी व त्या तिथींना पितृश्राद्ध केल्यास होणारे फायदे
४ अ. कल्पादी तिथी : ब्रह्मदेवाच्या दिवसाची आदी तिथी असते, तिला कल्पादी तिथी म्हणतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा व पंचमी, वैशाख शुद्ध तृतीया, कार्तिक शुद्ध सप्तमी, मार्गशीर्ष शुद्ध नवमी, माघ शुद्ध त्रयोदशी, फाल्गुन वद्य तृतीया या कल्पारंभीच्या तिथी आहेत. या तिथींना श्राद्ध केल्यास पितरांची तृप्ती होते, असे शास्त्रात सांगितले आहे.
४ आ. अक्षय्य तृतीया (वैशाख शुद्ध तृतीया) : अक्षय्य तृतीया म्हणजे कृत युगाचा आरंभदिन. या दिवशी केले जाणारे पितृश्राद्ध, पितृतर्पण, दान वगैरे सर्व अक्षय्य होते; म्हणून या दिवशी पितरांसाठी अपिंड श्राद्ध किंवा निदान तर्पण तरी करावे.
(श्राद्ध करण्यासाठी असलेल्या आणखी काही विशेष तिथी व त्या तिथींना पितृश्राद्ध केल्यास होणारे फायदे १८ सप्टेंबर रोजी पृष्ठ २ वर `धर्मसत्संग' या सदरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.) (क्रमश:)
अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरील पुढील मार्गिकेला भेट द्या -
http://dainik.sanatan.org/visheshank/pitrupaksha
संदर्भ : सनातनचा ग्रंथ `श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)'.
ग्रंथ हवा असल्यास संपर्क : (०२१४३) २३३ १२०
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment