आरतीचे महत्त्व

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


अ. देवतेची स्तुतीपर आरती म्हणण्याने देवता प्रसन्न होणे :
आरतीत देवतेची स्तुती व देवतेच्या कृपेसाठी प्रार्थना केलेली असते. देवता स्तुतीप्रिय व कृपाळू असल्याने आरती करणार्‍यावर ती प्रसन्न होते.

आ. आरतीचे रचनाकार उन्नत असल्याने त्यांच्या संकल्पशक्‍तीचा फायदा मिळणे :
बहुतांशी आरत्यांची रचना ही संतांनी व उन्नत भक्‍तांनी केलेली आहे। उन्नतांचा संकल्प व आशीर्वाद असल्याने, आरती म्हटल्याने उपासकाला ऐहिक व पारमार्थिक अशा दोन्ही दृष्ट्या लाभ होतो.

इ जिवाची सुषुम्नानाडी जागृत होऊन त्याचा भाव जागृत होणे :
भक्‍तीमार्गानुसार साधना करणार्‍यात ईश्‍वराबद्दल भक्‍तीभाव लवकर निर्माण होणे जरूरीचे असते. प्राथमिक अवस्थेतील साधकात अमूर्त म्हणजे निर्गुण रूपातील ईश्‍वराप्रती भाव निर्माण होणे कठीण असते. याउलट मूर्त म्हणजे सगुण रूपातील, मानवी देह धारण केलेला ईश्‍वर साधकाला जवळचा वाटतो व त्याच्याप्रती साधकात भावही लवकर निर्माण होतो. आरती हे सगुणोपासनेचे एक सोपे माध्यम आहे.`आरतीच्या वेळी आरतीतील शब्दांचे सूक्ष्म-रूप हे समोरील देवतेची मूर्ती अथवा प्रतिमा यांना हळुवारपणे स्पर्श करून आरती म्हणणार्‍या व ऐकणार्‍या जिवांकडे जाते. जिवांच्या सूक्ष्म-देहावर त्याचा परिणाम होतो. आरतीतील शब्द त्यांच्याबरोबर असलेली सात्त्विकता जिवांच्या सूक्ष्म-देहावर प्रक्षेपित करतात. त्यामुळे आरती म्हटल्यावर हलके झाल्याचे जाणवते. आरतीतील शब्दांमुळे जिवांची सुषुम्नानाडी जागृत झाल्यामुळे त्यांचा भाव जागृत होतो.'

(कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ईश्‍वरी ज्ञान, १६.१.२००५, सायंकाळी ७ ते रात्री १२.२२)






0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: