महाव्रत : एकादशी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

मौन, सत्य व मृदु भाषण या वाचिक व्रतांमुळे वैरभाव कमी होतो !



चातुर्मासाची सुरुवात आषाढ शु। एकादशीने होते. एकादशी या तिथीला अन्य दिवसांच्या तुलनेमधे प्रत्येकामधील सात्त्विकता सर्वात अधिक असते. त्यामुळे या दिवशी साधनाकरण अधिक सोपे जाते आणि साधनेपासून होणारा लाभ हा सर्वाधिक असतो.


पद्मपुराणामध्ये एकादशी या व्रताचे महत्त्व असे सांगितले आहे। अश्‍वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च । कादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।।

अर्थ : अनेक सहस्र अश्‍वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही म्हणजे ६ टक्के इतकेही महत्त्व नाही। आता आपल्या मनात प्रश्‍न निर्माण होईल, एवढे जर एकादशीचे महत्त्व आहे, तर एकादशीपासून लाभतरी नेमका कोणता होतो ? पद्मपुराणामध्ये पुढे म्हटलेले आहे -


स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी । सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी । न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च । - पद्मपुराण आदिखंड

अर्थ : एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे। गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही। एकादशी या व्रताचं आणखीन एक महात्म्य आहे. हे व्रत करतांना संकल्प करावा लागत नाही. इतर सर्व व्रते सुरू करतांना, व्रतारंभ करतांना संकल्प करून ती सुरू करावी लागतात. एकादशीचे व्रत करतांना संकल्प करावा लागत नाही, यावरून आपल्याला लक्षात आले असेल की, संकल्प न करतासुद्धा म्हणजे विधीवत् ईश्‍वराला न सांगतासुद्धा हे व्रत केल्यामुळे मनुष्याला फलप्राप्‍ती होऊ शकते. एकादशीच्या दिवशी उपवास करतात. या दिवशी काही न खाता फक्‍त पाणी व सुंठ-साखर घेतल्यास सर्वोत्तम होय. या दिवशी विष्णुपुजन करून अहोरात्र तुपाचा दिवा लावतात. दुसर्‍या दिवशी महानैवेद्य दाखवून पारायणे करतात.


आषाढी एकादशी

वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळयासमोर येते ती पंढरपुरची वारी. गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्‍तीभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो। भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे. एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते. जी व्यक्‍ती अजिबात साधना करत नाही अशा व्यक्‍तीला ईश्‍वरोपासनेकडे वळण्यासाठी व्रते खूप महत्त्वाची आहेत.


कार्तिकी एकादशी

पहिली महाएकादशी म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी महाएकादशी म्हणजे कार्तिकी एकादशी. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी असते, तर कार्तिकी एकादशीला आळंदीला संत ज्ञानेश्‍वरांच्या समाधीकडे वारी असते. या कार्तिकी एकादशीचं आणखीन एक महत्त्व आहे. या एकादशीला विष्णूला बेल वाहिला तर चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते. आता कार्तिकी एकादशीला शिवाला तुळस वाहता येते आणि विष्णूला बेल वाहता येतो, असं का ? एकतर ही गोष्ट हरि आणि हर म्हणजे विष्णु आणि शिव यांच्यातलं अद्वैत दाखवणारी आहे. याचं अध्यात्मशास्त्रीय कारण असं आहे, कालमहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये विष्णुतत्त्वाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्याचप्रमाणे या दिवशी तुळशीमध्ये शिवतत्त्वाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि विष्णूला बेल वाहतात.






0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: