विज्ञान व अध्यात्मशास्त्र : `विशेष ज्ञान, शास्त्रीय ज्ञान, तत्त्वज्ञान, अपरोक्षज्ञान, ब्रह्मज्ञान असे विज्ञान या शब्दाचे विविध अर्थ आहेत; पण सामान्यपणे जड पदार्थ आणि नैसर्गिक घटना यांचे निरीक्षण करून व प्रयोग करून, आपल्या इंद्रियांच्या साहाय्याने जे ज्ञान प्राप्त होते, ते क्रमबद्ध व नियमबद्ध केले असता जे शास्त्र निर्माण होते, त्याला विज्ञान म्हणतात.
यासंबंधी प्रा. के.वि. बेलसरे यांनी जे विवेचन केले आहे, ते असे - भौतिक वस्तूंचे गुणधर्म व परस्परसंबंध जाणून घेऊन, त्यांतील सामान्य नियम शोधून काढणे व त्या नियमांची तर्कशुद्ध प्रणाली बनवणे, हे विज्ञानाचे कार्य होय. सूक्ष्म निरीक्षण, वर्गीकरण, नियम व त्यांच्या आधारे अनुमान करणे या विज्ञानपद्धतीच्या चार पायर्या आहेत. वस्तूंच्या वागण्याचे नियम समजले की, त्यांच्या वागण्यावर सत्ता चालवण्याचा प्रयत्न करता येतो. अशा रीतीने वीज, उष्णता, प्रकाश, आवाज, पाणी, हवा इत्यादी शक्तींना स्वाधीन करून घेऊन स्थल, काल, गती, रोग इत्यादींवर मनुष्य विजय मिळवू शकतो. विज्ञानाचा मुख्य भर वस्तूंमधील कार्यकारणसंबंध निश्चित करण्यावर असतो. विज्ञानाच्या दृष्टीने जगातील सर्व घटना अत्यंत नियमबद्ध आहेत. निसर्गात गूढ, चमत्कारमय असे काही नाही. ज्या घटना गूढ वाटतात, त्यांचा कार्यकारणभाव कळल्यानंतर त्या गूढ वाटत नाहीत. कार्यकारणभावाच्या ज्ञानाचा उपयोग करून मनुष्याने आगगाडी, विमाने, विजेचे दिवे, रेडिओ, दूरध्वनी इत्यादी विलक्षण साधने निर्माण केल्यामुळे आपले नित्याचे जीवन पार बदलून गेले आहे. भौतिक विज्ञानामुळे मानवाला बाह्यसमृद्धी प्राप्त झाली असली, तरी आंतरिक समाधान मिळत नाही. प्राचीन भारतीय पंडितांनी समाजाला आंतरिक व बाह्य सुख सारखेच लाभावे, या दृष्टीने प्रयत्न केले; कारण आंतरिक सुखावाचून बाह्यसुख निरर्थक ठरते. इ.स.च्या १० व्या शतकानंतर आमच्या देशाची उन्नती कुंठित झाली; कारण आम्ही केवळ आंतरिक साधनेलाच महत्त्व देऊ लागलो. भक्ती व धर्म या क्षेत्रांत विपुल विचारविमर्श चालू राहिला; पण विज्ञानाकडे आम्ही दुर्लक्ष केले; इतकेच नव्हे तर प्राचीन ऋषीमुनींनी संग्रहित केलेले ज्ञानही आम्ही विसरून गेलो.' `सध्या जेवढी वैज्ञानिक प्रगती होत आहे तेवढा मानव दु:खी होत चालला आहे; कारण त्या प्रगतीमुळे मनुष्याची विषयलोलूपवृत्ती वाढत जाऊन अनैतिकता बोकाळली आहे. सर्व समृद्ध राष्ट्रांची अवस्था पाहिली तर आज अशीच दिसते. तेव्हा विज्ञानाच्या प्रगतीला आपण उत्क्रांती म्हणू शकत नाही, तसेच त्याला आपण सुधारणाही म्हणू शकत नाही; कारण ज्यामुळे मानव सुखी होईल, ती सुधारणा होय. सु-धारणा म्हणजे मानवी मनाची सत्त्वप्रधान वृत्ती ! सुरुवातीला वैज्ञानिक प्रगती होऊ लागल्याबरोबर मनुष्य नास्तिक झाला; परंतु त्या वैज्ञानिक प्रगतीची जेव्हा `अती प्रगती' होऊ लागली तेव्हा मनुष्य पुन्हा आस्तिक होऊ लागला; कारण त्या प्रगतीला मर्यादा पडू लागली आणि त्या प्रगतीची विनाशकारिता लक्षात येऊ लागली. हळूहळू असे लक्षात येऊ लागले की तिच्याशिवाय आपण जगू शकत नसलो तरी तिला धर्माची जोड असली, तर मनुष्य पुष्कळच सुखी होऊ शकेल. मनुष्य पूर्ण सुखी फक्त स्वधर्माचरणानेच होऊ शकतो.'
- प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जि. पुणे, महाराष्ट्र.
आज विज्ञान म्हणते, `मंगळावर जाऊन आल्यावर खूप मोठा टप्पा पार होईल, तेथे जीवसृष्टी आहे कि नाही ते ठाऊक होईल' वगैरे. अध्यात्मात सूक्ष्मदेहाने मंगळावर जाऊन येणे याला `गारुड्याचा खेळ' किंवा `चित्तशुद्धी झाली' एवढेच म्हटले जाते.
शास्त्रीय उपकरणांच्या साहाय्याने वैज्ञानिकांना नीलबिंदूचा शोध लागला, तर ते त्याचे अस्तित्व मान्य करतील, त्याच्याविषयी वर्षानुवर्षे विचार करत बसतील, चर्चा करत बसतील आणि प्रबंध लिहीत बसतील; परंतु थोडे ध्यान करून अंतर्यामी प्रवेश मिळवून त्या नीलबिंदूचा प्रत्यक्ष अनुभव घेणेच या सार्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या अंतर्यामी आनंद फुलेल. दिव्य अंतर्संगीत ऐकू येऊ लागेल आणि दिव्यदर्शन, दूरश्रवणादि सिद्धी प्राप्त होतील. अंतराकाशातून दिव्य अमृत स्रवू लागेल.' यासाठीच विज्ञान म्हणजे जाणून घेण्याच्या प्रक्रियेतील पहिले पाऊल, तर अध्यात्म म्हणजे शेवटचे पाऊल आहे.
संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ : अध्यात्म
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment