चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ झाला. त्या निमित्त वाचकांसाठी आचारधर्माविषयीचे विवेचन येथे देत आहोत. आज आपण विविध स्वरूपाचे आचार व त्यांचे पालन कसे करावे, याविषयी पाहूया.
विविध स्वरूपाचे आचारस्मृतींनुसार आचार

१. अत्रीस्मृतीतील आचार : अत्रीऋषींनी या स्मृतीत सांगितलेल्या आचारधर्मातील काही ठळक आचार पुढे दिले आहेत.
१ अ. सुवासिनी स्त्रियांनी त्यांच्या पतीच्या आज्ञेविना उपवास, तप, व्रते इत्यादी करू नयेत.
१ आ. सुवासिनी स्त्रियांनी त्यांच्या पतीलाच स्वत:चे सर्वस्व समजावे.
१ इ. वेदांइतके पवित्र ज्ञान नाही, मातेपेक्षा श्रेष्ठ गुरु नाही व दानासारखा मित्र नाही.
१ ई. दुष्काळात अन्नदान करणारा, सुकाळात सुवर्णदान करणारा आणि निर्जल प्रदेशात पाणपोईची व्यवस्था करणारा यांना स्वर्ग प्राप्‍त होतो.
१ उ. अन्नदान, सुवर्णदान व जलदान या दानांपेक्षाही विद्यादान श्रेष्ठ आहे.

२. यमस्मृतीतील आचार : कर्मफल व आचारधर्म यांसंबंधीचे नियम या स्मृतीत विशद केले आहेत, उदा. तलाव, विहिरी व देवालये यांचा जीर्णोद्धार करणार्‍याला ती नवीन बांधल्याचे पुण्यफळ मिळते.

३. पराशरस्मृतीतील आचार : या स्मृतीत कलीयुगात पाळावयाचा आचारधर्म दिला आहे. या स्मृतीत सांगितलेले काही आचार पुढीलप्रमाणे आहेत.
३ अ. मीठ, मध, तेल, दही व दूध कोणाकडूनही विकत घेतल्यास घेणार्‍याला दोष लागत नाही.
३ आ. ब्राह्मणाने चांगले आचरण करणार्‍या शुद्राच्या घरी तूप, दूध, तेल व गूळ यांचे पदार्थ सेवन करण्यास हरकत नाही.
३ इ. वैश्य व क्षत्रिय यांच्या घरी देव व पितृ कार्य करणार्‍या ब्राह्मणाने अन्नसेवन करण्यास हरकत नाही. ३ ई. योग्य कारणावाचून स्त्रीचा त्याग करणारा ७ जन्म स्त्री होऊन वैधव्याचे दु:ख भोगतो.
३ उ. पतीच्या आज्ञेशिवाय पत्नीने व्रत करू नये.

४. शंकस्मृतीतील आचार : या स्मृतीत प्रत्येकाचे वर्णोचित नाव कसे असावे व विशेषकरून स्त्रीने कसे वागावे, या संदर्भातील नीतीनियमांचे वर्णन केले आहे.
४ अ. ब्राह्मणाच्या नावाच्या शेवटी `शर्मा', क्षत्रियाच्या नावाच्या शेवटी `वर्मा', वैश्याच्या नावाच्या शेवटी `गुप्‍त' व शूद्राच्या नावाच्या शेवटी `दास' असे उपपद लावावे.
४ आ. कुलीन स्त्रीने वेश्या, चेटूक करणारी, कपटी व व्यभिचारी स्त्रीच्या आणि धूर्त पुरुष व संन्यासी यांच्या सहवासात राहू नये.

५. वसिष्ठस्मृतीतील आचार : सर्वसामान्य व्यक्‍तीलाही आचरणात आणता येतील, अशा सोप्या सदाचारांचे महत्त्व या स्मृतीत सांगितले आहे. त्याचबरोबर सज्जन व दुर्जन कोणाला म्हणावे, याच्या व्याख्याही या स्मृतीत दिल्या आहेत.' आचारांचे पालन कसे करावे ?

१. `मृत्यूने माझे केस पकडले आहेत', असे समजून धर्माचे आचरण करणे आवश्यक :
अजराऽमरवत्प्राज्ञो विद्यामर्थं च चिन्तयेत् ।
गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ।।
आहरेज्ज्ञानमर्थांश्च नरो ह्यमरवत्सदा ।
केशैरिव गृहीतस्तु मृत्युना धर्ममाचरेत् ।। - हितोपदेश, कथामुखं ३
अर्थ : बुद्धीमान मनुष्याने स्वत:ला अजरामर जाणून विद्या व धन मिळवावे आणि `मृत्यूने माझे केस पकडले आहेत (मृत्यूच्या हातात आपली शेंडी आहे)', असे समजून धर्माचे आचरण करावे.

२. नित्यनैमित्तिक कर्मे कर्तव्यबुद्धीने व अनासक्‍तीने आमरण आचरणे आवश्यक :
`आपली सहजकर्मे (नित्यनैमित्तिक कर्मे) कर्तव्यबुद्धीने व अनासक्‍तीने आमरण आचरलीच पाहिजेत. चित्तशुद्धी ही या जन्मी नव्हे, तर अनेक जन्मांच्या अंती प्राप्‍त झाली, तर कैवल्याची वाटचाल करता येणे शक्य होते.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

३. सर्व कर्मे भगवंताला समर्पण केल्यामुळे होणारा आचरणशुद्धीचा लाभ सर्वश्रेष्ठ असणे :
`श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्‌गीतेत (९.२७) सांगितले आहे, `जे काही सेवन कराल, हवन-यज्ञ कराल, तपादी कर्मे कराल, ती सगळी भगवंताला समर्पित करा.' असे केल्याने काही निषिद्ध व चुकीचे घडणारच नाही. अभक्ष्यभक्षण व अपेयपान घडणार नाही. मांस निषिद्ध असल्याने प्राणीजिवांचे हनन होणार नाही. निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तंूचे दान होणार नाही. मग जे पहायला हवे, तेच डोळयांनी पाहिले जाईल; जे ऐकायला हवे, तेच कानांनी ऐकले जाईल व जे बोलायला हवे, तेच वाणी बोलेल. अशी सगळी इंद्रिये जे करायला हवे, तेच करतील. समर्पणामुळे होणारा आचरणशुद्धीचा हा सर्वश्रेष्ठ लाभ होय.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
निगडीत : हिंदूंनो धर्मशिक्षण घ्या!

मैत्री दिनाचा देखावा कशाला ? : 2008-08-07
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण : 2008-08-04
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण : 2008-08-03
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मप्रबोधन : 2008-07-27
गणेश चतुर्थी : 2008-07-27
महाव्रत : एकादशी : 2008-07-27
धर्मसत्संग : 2008-07-24
चातुर्मासाचे आध्यात्मिक महत्त्व : 2008-07-15
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवा ! : 2008-07-04
पादत्राणे घालून पूजन केले व नारळ वाढवला ! : 2008-06-१२

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: