गणेशोत्सव विशेष - ३

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपतीच्या मूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ पाहूया.


सनातनची सात्त्विक श्री गणेशमूर्तीगणपतीला तुळस न वहाण्याचे कारण
पौराणिक कारण : `एक अप्सरा अती सुंदर होती. तिला उत्तम पती हवा होता. त्यासाठी ती उपवास, जप, व्रते, तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती. एकदा तिला ध्यानात मग्न असलेला श्री गणपति दिसला. तिला तो फार आवडला; म्हणून त्याला ध्यानातून जागे करण्यासाठी तिने हाका मारल्या, `हे एकदंता, हे लंबोदरा, हे वक्रतुंडा !' ध्यानाचा भंग झाल्यामुळे गणपतीने डोळे उघडले. तेव्हा त्याला अप्सरा दिसली. तो तिला म्हणाला, `हे माते, माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस ?' ती म्हणाली, `मला तू फार आवडला आहेस. मी तुझ्याशी विवाह करणार.' गणपति म्हणाला, `मी कधीच विवाह करून मोहपाशात पडणार नाही.' त्यावर अप्सरा म्हणाली, `तू विवाह करशीलच, असा मी तुला शाप देते.' गणपतीने तिला प्रतिशाप दिला, `तू पृथ्वीवर वृक्ष होशील.' अप्सरेला पश्चात्ताप होऊन ती म्हणाली, `मला क्षमा कर.' गणपति म्हणाला, `माते, कृष्ण तुझ्याशी विवाह करील व तू सुखी होशील.' ती अप्सरा पुढे तुळस बनली. गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही; म्हणून गणपतीला तुळस वहात नाहीत.'

अन्य कारण : श्री गणपति ही जास्तकरून सकाम भक्‍तीची देवता आहे, तर तुळस ही वैराग्यदायक आहे; म्हणून गणपतीला तुळस वहाणे निषिद्ध समजतात.

चतुर्थी
इतिहास : गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा व चतुर्थीचा संबंध जोडला गेला.

श्री गणेशजयंती : माघ शुद्ध चतुर्थी ही `श्री गणेश जयंती' म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असते.

श्री गणेश चतुर्थी
महत्त्व : विनाशकारक, तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या १२० दिवसांत जास्त प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्रता जास्त असते. त्या तीव्रतेच्या काळात, म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत, गणेशलहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येत असल्याने यमलहरींची तीव्रता कमी व्हायला मदत होते. (या लहरींविषयी अधिक माहिती सनातनचा ग्रंथ `सण, धार्मिक उत्सव व व्रते' यात दिली आहे.)
श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ हजार पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

कुटुंबात कोणी करावी ? : `श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे `सिद्धीविनायक व्रत' या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्‍त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) व पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश व पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्‍त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पुजावी.'

नवीन मूर्तीचे प्रयोजन : पूजेत गणपति असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश याप्रमाणे आहे - श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्‍ती येईल. जास्त शक्‍ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात व ती मूर्ती नंतर विसर्जित करतात. गणपतीच्या लहरींत सत्त्व, रज व तम यांचे प्रमाण ५:५:५ असे आहे, तर सर्वसाधारण व्यक्‍तीत १:३:५ असे आहे; म्हणून गणेशलहरी जास्त वेळ ग्रहण करणे सर्वसाधारण व्यक्‍तीला शक्य नसते.

श्री गणेशाभोवती सजावट करतांना गणेशतत्त्व आकर्षित करणार्‍या आकृतीबंधाचा वापर करणे : अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व. गणेशतत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे गणपतीला लाल फूल, दूर्वा, शमीची पत्री, मंदारची पत्री इत्यादी वहातात, तसे काही आकृतीबंधांमुळेही गणेशतत्त्व आकर्षित होण्यास मदत होते. (क्रमश:)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `श्री गणपति'. ग्रंथ हवा असल्यास संपर्क : रत्‍नागिरी (०२३५२) २२२३४६, चिपळूण (०२३५५) २५३८०८--------------------------------------------------------------------------------


श्री गणेश चतुर्थी आदर्शरीत्या साजरी करून गणेशतत्त्वाचा लाभ मिळवूया !
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो. `आपल्या घरात गणपति येणार आहे', या कल्पनेने आपले मन भरून येते. काही कुटुंबांत तर गणेश चतुर्थीची तयारी एक महिना आधीच सुरू होते. संपूर्ण घराची साफसफाई करणे, घराला रंगरंगोटी करणे इत्यादी सेवा सुरू होतात. गणेशोत्सवाला ४-५ दिवस असतांना मोदक, करंज्या बनवणे सुरू होते. या उत्सवात नातेवाईक व मित्रमंडळी घरी येतात; पण नेमकं होतं काय, तर आपण उत्सवामध्ये मनोरंजनात कधी मग्न होतो, हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे `गणपति आपल्या घरी आहे', हेच आपण विसरतो. या उत्सवात आपण करत असलेल्या कृतींतील त्रुटी वगळल्यास व दृष्टीकोन योग्य ठेवल्यास आपल्याला श्री गणेशाचा आध्यात्मिक फायदा पूर्णपणे मिळून श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेल्या कष्टाचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल. काल आपण धार्मिक विधी कशा करायच्या ते पाहिले. आज आपण आरती करतांना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, ते पाहूया.

आरती करतांना खालील गोष्टी टाळाव्यात
अ. आरती सुरू झाल्यानंतर अव्यवस्थितपणे उभे रहाणे.
आ. कर्णकर्कश स्वरात व अनेक आरत्या म्हणणे
इ. देवाशी काडीमात्र संबंध नसलेल्या गीतांच्या किंवा चित्रपट गीतांच्या चालीत असलेल्या आरत्या लावणे
ई. आरती चालू असतांना एकमेकांकडे पाहून हसणे, खाणाखुणा व चेष्टा करणे इत्यादी (क्रमश:)

साभार - गणेशोत्सव विशेष - ३

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: