गणेशोत्सव विशेष - २

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्री गणेशाच्या उपासनेमुळे बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते !

भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्त
श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपतीची काही वैशिष्ट्ये पाहू.

विवेकबुद्धी निर्माण करून चित्त शांत करणारा
`श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूषित शक्‍ती आकर्षून घेणारा आहे, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्‍ती जोर करत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते. `मी कोण, भगवंताने मला या जगतात कशासाठी पाठवले', याची साधकाला जाणीव होऊन तो श्रद्धापूर्वक कार्य करू लागतो. साधकाच्या भावात वाढ होऊन त्याची उत्तरोत्तर होऊ लागते.' - प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

सर्व संप्रदायांना पूज्य
`आपली उपास्यदेवताच सर्वश्रेष्ठ आहे व तीच विश्‍वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारी आहे; अन्य देवता नाहीतच', असे सांप्रदायिक मानतात. संप्रदाय अनेक असले, तरी प्रत्येक संप्रदायात श्री गणेशपूजा आहे. शैव संप्रदायात श्री गणपति हा शिवाचा पुत्र आणि शिवाचा मुख्य गण असा आढळतो, तर वैष्णव संप्रदायात तो अनिरुद्ध, वासुदेव आदी रूपांत आढळतो. शाक्‍त संप्रदायात (देवी संप्रदायात) दक्षिणमार्गी आणि वाममार्गी असे दोन प्रकार आहेत. दोन्हींमध्ये श्री गणेशपूजन केले जाते. या संप्रदायात तो शक्‍तीगणपति, लक्ष्मीगणपति अशा वैवाहिक रूपांत दर्शवला जातो, तसेच स्त्रीरूपातही पुजला जातो. श्री गणेशपूजन जैन पंथातही केले जाते. बौद्ध धर्म स्वीकारणार्‍या सम्राट अशोकाच्या चारुमती नावाच्या कन्येने नेपाळमध्ये श्री गणेशमंदिर बांधले. `हेरंब' या नावाने प्रसिद्धी पावलेला तेथील श्री गणेश सिंहासनाधिष्ठित असून त्याला पाच मस्तके व दहा हात आहेत, असा उल्लेख श्री गणेशसाहित्यात आढळतो.


संतांनी गौरविलेले दैवत

निरनिराळया साधनामार्गांतील संत वेगवेगळया देवतांचे उपासक असले, तरी सर्व संतांनी श्री गणेशाची आळवणी व त्याचे स्तवन आवर्जून केले आहे. सर्व संतांसाठी श्री गणेश ही अतीपूजनीय देवता होती. मराठी संतवाङ्मयातून तर श्री गणेशाचे लौकिक आणि पारलौकिक स्वरूप मोठ्या सुबकरीत्या वर्णन केलेले आढळते. संतशिरोमणी श्री ज्ञानदेवमाउलींनी भावार्थदीपिकेच्या (ज्ञानेश्‍वरीच्या) आरंभी `देवा तूचि गणेश, सकल मती प्रकाशु' असे म्हणून गणरायाला सविनय वंदिले आहे. संत एकनाथांनी भागवतटीकेत श्री गणेशाला पुढीलप्रमाणे प्रथमवंदन केले आहे - `ओम् अनादि आद्या । वेद वेदान्त विद्या । वंद्य ही परमा वंद्या । स्वयंवेद्या श्रीगणेशा ।।' संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला व श्री गणेशाला एकाच वेळी भोजनास बोलावल्याचे सांगितले जाते. संत नामदेवांनी `लंबोदरा तुझे शुंडादुंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ।।', असे म्हटले आहे. संत तुलसीदासांनीही `रामचरितमानस'च्या आधी श्री गणेशस्तवन केले आहे. (क्रमश:)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणपति')

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: