
गुरुकृपायोगानुसार साधनेतील टप्पे व सर्व योगांमध्ये गुरुकृपायोगाचे महत्त्व येथे देत आहोत.
गुरु
`गु'कार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार व `रु'कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज; म्हणून गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालविणारा. शिष्याचे अज्ञान घालवून त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी जे साधना सांगून ती करवून घेतात व अनुभूती देतात, त्यांना गुरु असे म्हणतात. गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते (कारण ते प्रारब्धानुसार असते), तर फक्त आध्यात्मिक उन्नतीकडे असते. (सनातनचा ग्रंथ : गुरुकृपायोग)
आपल्या भोवतालचे जग ही माया आहे. मायेतील कोणत्याही गोष्टीचा गुणधर्म `आनंद' नाही. आनंदप्राप्तीसाठी `आनंद' हा गुणधर्म असलेले काहीतरी प्राप्त करून घेणे आवश्यक असते. या जगात आनंदमय असे केवळ ईश्वरीतत्त्वच आहे. म्हणजेच आनंदप्राप्तीसाठी आपल्याला ईश्वरप्राप्ती करायला हवी. ईश्वरप्राप्ती म्हणजेच ईश्वराशी एकरूप होणे, ईश्वराचे गुण आपल्यात आणणे. ईश्वरप्राप्तीसाठी दररोज किमान दोन-तीन तास शरीर, मन व / किंवा बुद्धी यांनी जे प्रयत्न केले जातात, त्याला साधना म्हणतात.
गुरुकृपायोग
कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.
गुरुकृपायोगाचे महत्त्व
निरनिराळया योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालविता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते. पुढील मार्गदर्शक तत्त्वे समजून घेऊन त्यांनुसार साधना करणे आवश्यक असते -
गुरुकृपायोगानुसार साधनेची तत्त्वे
१. आवड व क्षमता यांनुसार साधना,
२. अनेकातून एकात जाणे,
३. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे,
४. पातळीनुसार साधना,
५. वर्णानुसार साधना,
६. आश्रमानुसार साधना,
७. काळानुसार साधना व
८. तत्त्वानुसार साधना. (सनातनचा ग्रंथ : गुरुकृपायोगानुसार साधना)
गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पे
व्यष्टी साधना व समष्टी साधना हे गुरुकृपायोगानुसार साधनेचे दोन प्रकार आहेत. व्यष्टी साधना म्हणजे वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्न. समष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्न.
व्यष्टी साधनेच्या अंतर्गत स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, नामजप, सत्संग, सत्सेवा, अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, सत्साठी त्याग, भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, साक्षीभाव हे टप्पे येतात. गुरुकृपायोगाप्रमाणे साधना करणार्या साधकांचा निर्गुण स्थितीतील नामजपाच्या टप्प्यात आपोआपच प्रवेश होतो. समष्टी साधनेच्या अंतर्गत सर्वोत्तम सत्सेवा अध्यात्मप्रसार, राष्ट्ररक्षण व धर्मजागृती, क्षात्रधर्म साधना, इतरांबद्दल प्रीती, वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ नामजप करणे, इतरांबद्दल प्रीती असे टप्पे येतात. काळमहिम्याप्रमाणे व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना महत्त्वाची आहे. व्यष्टी साधनेला ३० टक्के, तर समष्टी साधनेला ५० टक्के महत्त्व आहे. - श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ६.४.२००४, सकाळी ८.५०)
गुरुकृपायोगाचे श्रेष्ठत्व
गुरुकृपायोगात ईश्वराबद्दलची भक्ती व ज्ञान या दोहोंचा अपूर्व संगम असल्याने `गुरुकृपायोग' हा सर्वश्रेष्ठ योग असणे : साधकाची फक्त ईश्वरावर भक्ती असून चालत नाही. त्याने भक्तीला ज्ञानाची जोड दिली, तरच त्याची प्रगती झपाट्याने होते. गुरुकृपायोगात ईश्वराबद्दलची भक्ती व ईश्वराबद्दलचे ज्ञान या दोहोंचा अपूर्व असा संगम असल्याने `गुरुकृपायोग' हा सर्वश्रेष्ठ योग आहे. - श्री गुरुतत्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.११.२००३)
गुरुकृपायोग' हा अक्षय आनंदाची अनुभूती देणारा कर्मयोग, भक्तीयोग व ज्ञानयोग यांचा त्रिवेणी संगम असणे :`गुरुकृपायोग' हा कर्मयोग, भक्तीयोग व ज्ञानयोग या योगांचा त्रिवेणी संगम आहे, म्हणजेच तीन योगांचा काला आहे. याची चव चाखणे, म्हणजे गुरुकृपायोगाद्वारे अक्षय आनंदाची अनुभूती घेणे होय. त्यामुळे `गुरुकृपायोग' हा प.पू. डॉक्टरांनी साधकांसाठी दिलेला गोपाळकाल्याचा प्रसाद होय. (डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे यांच्या माध्यमातून, २९.७.२००५, सकाळी ७.५५ ते ८.०५)
प्राणायाम व गुरुकृपायोग : प्राणायामामुळे जिवामध्ये घडणारे बदल हे तात्पुरते असतात; म्हणून प्राणायामापेक्षा कायमस्वरूपी जीवनामध्ये बदल घडवणारी नामासहित समष्टी साधना करणे जास्त श्रेष्ठ आहे. प्राणायाम जिवाला सुख देते, तर नामासहित समष्टी साधना ही जिवाला आनंदाकडे नेते. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २८.७.२००४, सायं. ५.३९)
ध्यानयोग व गुरुकृपायोग : गुरुकृपायोगामध्ये ध्यानयोगातील `मन निर्विचार होणे व निर्विकल्प होणे' यांना विशेष असे महत्त्व दिलेले नाही; कारण या टप्प्यात वाईट शक्तींच्या हल्ल्याला बळी पडण्याची शक्यता असते. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १.८.२००४, रात्री ८.१२)
गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या जिवाच्या दृष्टीने कर्मकांडात केल्या जाणार्या कृती गौण ठरतात.' - एक विद्वान
खरे म्हटले तर कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग वगैरे गुरुप्राप्तीपर्यंतच महत्त्वाचे असतात. नंतर गुरूंनी सांगितलेलीच साधना शिष्य करीत असल्याने पुढे फक्त गुरुकृपायोगच उरतो.
(डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना ध्यानात मिळालेली माहिती)
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment