गुरुमंत्राचा अर्थ व महत्त्व

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवाअर्थ : गुरुमंत्रात मंत्र हा शब्द असला तरी बहुधा शिष्याने कोणता नामजप करावा, ते गुरूंनी सांगितलेले असते. तन, मन व धन यांचा ५५ टक्क्याहून जास्त भाग अध्यात्मासाठी वाहिला की मगच गुरुमंत्र मिळतो. म्हणूनच कित्येक वर्षे गुरूंच्या सहवासात असलेल्यांची तेवढी पातळी आली नसल्यास गुरु त्यांना गुरुमंत्र देत नाहीत. तीव्र मुमुक्षुत्व असलेल्या साधकाला मात्र लवकर गुरुप्राप्‍ती होऊ शकते.

महत्त्व : आपल्या आवडीच्या देवाच्या नामाचा जप करण्यापेक्षा पुढील कारणांसाठी गुरूंनी सांगितलेल्या नामाचा जप करावा.
१. आपल्या उन्नतीसाठी कोणते नाम घ्यावे, हे आपल्याला कळत नाही; ते गुरुच सांगू शकतात.
२. आपल्या आवडीच्या देवाच्या मंत्राने फक्‍त सात्त्विकता वाढायला मदत होते; तर गुरुमंत्राने निर्गुणापर्यंत जाता येते.
३. गुरुमंत्रात नुसती अक्षरे नसून ज्ञान, चैतन्य व आशीर्वादही असल्याने उन्नती लवकर होते. त्या चैतन्ययुक्‍त नामाला सबीजमंत्र किंवा दिव्यमंत्र म्हणतात. त्या बिजापासून फळ मिळवण्यासाठी अर्थातच साधना करावी लागते.
४. गुरूंवर श्रद्धा असल्याने आपण स्वत: ठरवलेल्या मंत्रापेक्षा तो जास्त श्रद्धेने घेतला जातो. तसेच गुरूंची आठवण झाली की नाम घ्यायची आठवण होत असल्याने ते खूपदा घेतले जाते.
५. स्वत:च्या आवडत्या देवाचे नाम घेतांना थोडातरी अहंभाव असतो. याउलट गुरूंनी दिलेले नाम घेतांना अहंभाव नसतो..

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: